I Am Atal Bihari Speaking ... | Sarkarnama

मै अटलबिहारी वाजपेयी बोल रहा हू... 

जयसिंगराव गायकवाड 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

 1998  मध्ये आमचे सरकार आले नाही पण   1999 मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येताच त्यांनी मला थेट केंद्रीय मंत्रीमंडळात  शिक्षण राज्यमंत्री केले .  

औरंगाबादः '' मै अटलबिहारी वाजपेयी बोल रहा हू, मंत्रीपद वगैरा बाकी सब छोडो, बीड मे जाकर लोकसभा लढो ये हमारा आदेश है, चून के आने के बाद मिलने को आओ'' अशा शब्दांत 1998 च्या लोकसभा निवडणुकीत अटलजींनी मला आदेश दिला. आगे क्‍या करना है मुझपे छोड दो, असे ते म्हणाले .

"रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये  पर वचन न जाये ' या ब्रीद वाक्‍याला आयुष्याचा मुलमंत्र बनवणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे माझ्या  जीवनात अनन्य  साधरण महत्व आहे. दिलेला शब्द पाळणारा त्यांच्या इतका प्रामाणिक नेता मी पाहिलेला नाही. 

 1998    मध्ये बीड भाजपच्या खासदार रजनीताई पाटील पक्ष सोडून गेल्या. मुळात भाजपमध्ये येण्याआधी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राजकारणात सक्रीय होताच मी पक्ष सोडून जाईन अशी अट त्यांनी पक्षाला घातली होती. 10 जानेवारी 98 ला सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षा झाल्या आणि रजनीताई पाटील यांनी दिल्लीतूनच राजीनामा पाठवून दिला. 

तेव्हा मी महाराष्ट्र मंत्रिमंडळात राज्यमंत्री होतो.  पदवीधर मतदारसंघाची माझी पाच वर्ष शिल्लक होती. त्यामुळे पक्षाने बीड लोकसभा लढवण्याच प्रस्ताव ठेवला तेव्हा मी नकार दिला. पण एक दिवस अचानक मला फोन आला " मै अटल बिहारी वाजपेयी बोल रहा हू, राज्यमंत्री, पदवीधर सब छोडो, बीड से लोकसभा चूनाव लढने  की तैयारी करो, ये मेरा आदेश है, आगे क्‍या करना है मै देख लूंगा. चूनकर आने के बाद दिल्ली मे मुझे आकर मिलो'' असे सांगत त्यांनी फोन ठेवला. 

पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा फोन आला म्हटल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्‍नच नव्हता. निवडणूक लढवली जिंकलो. 1999 मध्ये पुन्हा 52 हजारांनी जिंकलो तेव्हा वाजपेयीजींनी मंत्रीमंडळाच्या पहिल्याच यादीत माझे नाव टाकले. मला तुम्हाला केंद्रात राज्यमंत्री करण्यात आले आहे असा निरोप मिळाला. बीड से चुन के आये हुये नौजवान का नाम मंत्रीमंडल की लिस्ट मे समाविष्ट करो, असे वाजपेयी यांनी तेव्हा आर्वजून सांगितले होते. 

माझ्या आयुष्यातला हा सर्वात अनमोल प्रसंग होता. कार्यकर्त्याला जीवापाड जपणारे आणि दिलेला शब्द पाळणारे अटलबिहारी वाजपेयींचे व्यक्तीमत्व होते 

(जयसिंगराव गायकवाड हे बीडचे माजी खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री  आहेत . ) 

संबंधित लेख