husen and cm of maharashtra | Sarkarnama

महाराष्ट्रात मोदींच्या तोडीसतोड फडणवीसांचे काम - शाहनवाज हुसेन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

औरंगाबाद : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसे काम केले आहे, त्याच्या तोडीसतोड कामगिरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस आघाडीचा सुफडासाफ होईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी केला. उत्तर प्रदेश व इतर राज्यात भाजपला नुकसान होणार असा अंदाज वर्तवला जात असला तरी याची भरपाई आम्ही केरळ, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये करू असेही हुसेन यांनी सांगितले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालना येथे जाण्यासाठी शाहनवाज हुसेन औरंगाबादेत आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील दावा केला. ते म्हणाले, जनतेला पुन्हा पंतप्रधानपदी मोदी हवे आहेत, त्यामुळे प्रत्येक जण झपाटून कामाला लागले आहेत. देशपातळीवर मोदींनी जशी विकासकामे केली आहेत, तशीच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 जागांवर कॉंग्रेस सपाटून मार खाईल आणि भाजप त्यांना व्हाईटवॉश देईल. 

देशातील अनेक राज्यांचा दौरा करतांना मोदी विरुध्द इतर सगळे पक्ष असेच चित्र पहायला मिळते. जनतेला मोदी हवेत आणि विरोधी पक्षांना नकोत. पण आता मोदींना कोणतीही ताकद रोखू शकत नाही. पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. म्हणून सगळा राग ते ईव्हीएमवर काढतायेत असा टोला देखील शाहनवाज हुसैन यांनी लगावला. 

उत्तर प्रदेशात 74 जागा जिंकू 
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात यावेळी भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे? या प्रश्‍नावर गेल्यावेळी आमच्या 73 जागा आल्या होत्या. यावेळी एक जागा जास्त जिंकू असा दावा करतांनाच शाहनवाज हुसेन यांनी देशभरात मोदींच्या नावाचाच बोलबाला असल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही भाजपची बी टिम असल्याचा आरोप होत आहे, यावर दोन्ही पक्षांची स्वतंत्र विचारधारा आहे. एमआयएमसोबत भाजप कधीही जाऊ शकत नाही, त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नाही. दोघांचे मार्ग वेगळे असल्यामुळे कॉंग्रेसकडून होत असलेले आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख