hrishikant shinde meet udyanraje bhosale in satara | Sarkarnama

आमदार शशिकांत शिंदेंचे थोरले बंधु उदयनराजेंच्या गोटात! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

ऋषिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते असून ते व्यावसायिक आहेत.

सातारा : विधानसभेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे थोरले बंधु ऋषिकांत शिंदे यांची  खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी जवळीक वाढली आहे. सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंबाबत राष्ट्रवादीतील नेत्यांत वाढलेली नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर ऋषिकांत शिंदे यांची ही जवळीक आगामी काळात सातारा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला अडचणीची ठरणार आहे. 

ऋषिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते असून ते व्यावसायिक आहेत. ते मुळचे जावलीचे असल्याने या तालुक्‍यात त्यांचा चांगला संपर्क आहे. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ऋषिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीतून निवडणुक लढली होती. त्यांच्याविरोधात दीपक पवार भाजपमधून उमेदवार होते. यावेळी राष्ट्रवादीतंर्गत एक गट सक्रिय होऊन त्यांनी ऋषिकांत शिंदे यांच्या विरोधात काम करून त्यांचा पराभव केला. येथे भाजपचे दीपक पवार विजयी झाले होते. ऋषिकांत शिंदे विजयी झाले असते तर ते जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष झाले असते. हे काहींना नको होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षातील नेत्यांनी काम केले. निवडणुकीनंतर जावलीचे वसंतराव मानकुमरे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. येथे दीपक पवार आणि वसंतराव मानकुमरे यांच्यात खलबते झाली होती. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव ऋषिकांत शिंदेंना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीतच सवता सुभाच मांडला आहे. त्यापुढे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संबंध वाढवून त्यांच्याशी जवळीक सुरू केली आहे. या माध्यमातून ते आपले अस्तित्व दाखविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीशी त्यांची धुसफूस झाली असलीतरी तो वाद मिटणार की उदयनराजेंसोबत राहून पेटणार याचीच उत्सुकता आहे. 

संबंधित लेख