प्रकाश आंबेडकर माओवाद्यांचं समर्थन कसं करतात समजत नाही? : रावत

प्रकाश आंबेडकर माओवाद्यांचं समर्थन कसं करतात समजत नाही? : रावत

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रस्थापित केलेल्या सर्व संस्था मोडून काढण्याचा किंवा त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न आहे. याचसाठी डॉ. आंबेकरांचे नाव घेऊन सशस्त्र क्रांतीचे आवाहन केले जात आहे. एक जानेवारीला कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे झालेला हिंसाचार हा माओवाद्यांच्याच पूर्वनियोजित कटाचा भाग होता, असा आरोप भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन केलेल्या विविध संघटनांच्या सत्यशोधन समितीने काढलेला आहे.

कोरेगाव भीमा येथील ही दंगल कोणत्याही हिंदुत्त्ववादी व आंबेडकरी गटांनी घडवल्याचे दिसून येत नाही, असा निष्कर्ष विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने काढला आहे. स्थानिक पोलिसांनी पुरेशी सतर्कता न दाखवल्याने हिंसाचार भडकला, असाही आरोप या समितीने केला आहे.


प्रकाश आंबेडकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास सांगावा. ज्या डाॅ. आंबेडकरांनी संविधान निर्माण केले. ते संविधान सर्वजण मानतात. ते संविधान मोडण्याचे काम माओवादी करत आहेत. त्याचं समर्थन प्रकाश आंबेडकर कसे करत आहेत, हे समजत नाही, असा सवाल रावत यांनी उपस्थित केला.


माजी लष्करी अधिकारी कँप्टन स्मिता गायकवाड, लोकशाही जागर मंचाचे सागर शिंदे, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव अँड. सत्यजित तुपे, मातंग क्रांती सेनेचे प्रा. सुभाष खिलारे, मराठा युवा संघटनेचे दत्ता शिर्के, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार यांनी एकत्र येऊन तीन महिने वढू, कोरेगाव भीमा परिसरातील शेकडो लोकांशी चर्चा करुन हा अहवाल तयार केल्याचा दावा केला. भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या विवेक विचार मंचातर्फे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून तो मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे.

या सत्यशोधन समितीच्या म्हणण्यानुसार हिंसाचाराचा घटनाक्रम पाहता २८ डिसेंबर २०१७ रोजी वढू बुद्रूक येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बेकायदा फलक लावण्यात आला. यावर वादग्रस्त आणि बिनबुडाचा इतिहास लिहीलेला होता. हा फलक वादाचे कारण ठरला. फलक लावणारे लोक व संघटना आणि त्यांचे फुटीरतावाद्यांशी असलेले लागेबांधे या अनुषंगाने चौकशी होण्याची गरज आहे. पोलिस पाटलाने या फलकाची माहिती पोलिसांना देऊनही ते तात्काळ घटनास्थळी गेले नाहीत. पोलिसांनी तातडीने दखल घेतली असती तर तणाव निवळला असता, असे समितीचे म्हणणे आहे.

गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी कबील कला मंच, रिपब्लिकन पँथर या संशयित माओवादी गटांच्या सखोल चौकश झाली पाहिजे. हे दोन्ही गट गेल्या तीन-चार वर्षांपासून कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त प्रक्षोभक मांडणी करुन जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. बामसेफ, संभाजी ब्रिगेड या संघटनांची कृत्येही आक्षेपार्ह आहेत. वढू बुद्रूक ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी ३० डिसेंबरला पोलिसांना दिलेल्या पत्रात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा या संघटनांचा उल्लेख करुन संभाजी महाराज स्थळी नुकसान, इजा होण्याचा धोका व्यक्त केला होता,असे समितीने म्हटले आहे.

‘शिवाजीचे उदात्तीकरण’ या पुस्तकातून राष्ट्रपुरूष शिवाजी राजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली आहेत.कोरेगाव भीमा युद्धास दोनशे वर्षे झाल्यानिमित्त बामसेफच्या विलास खरात यांनी पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये जातीय तेढ वाढवणारे भडकाऊ तसेच वादग्रस्त लेखन आहे.त्यामुळे या दोन्ही पुस्तकांवर बंदी घालून लेखक, प्रकाशकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com