How to Ignore MNS Vote Bank Asks Raj Thakre | Sarkarnama

'मनसे'कडे व्होट बॅंक, त्याकडे दुर्लक्ष कसे करायचे : अजित पवार

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटोल येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत घेण्याबद्दल मत व्यक्त केले. राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला आहे.

नागपूर : राज ठाकरे यांच्या मनसेकडे निश्‍चितपणे एक व्होट बॅंक आहे. त्या पक्षाचे 13 आमदार राज्यात होते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'मनसे'ला आघाडीत घेण्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटोल येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत घेण्याबद्दल मत व्यक्त केले. राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ''काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. आम्ही कोणत्याही एका धर्माची पताका घेत नाही. या दोन्ही पक्षाची भूमिका राज ठाकरे यांना मान्य आहे काय? हे आधी स्पष्ट झाले पाहिजे."

ते पुढे म्हणाले, "राजकारणात अनेक बदल होत असतात. राज ठाकरे यांच्या मनसेचे राज्यात 13 आमदार निवडून आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अनेक उमेदवारांना लाखावर मते मिळालेली आहेत. राजकारणात कुणीच कायमचा शत्रू वा मित्र नसतो. आघाडीत कोणत्या पक्षांना सामील करून घ्यावयाचे, याबद्दल येत्या 2 नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे यांच्यासह इतर पक्षाबद्दल निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले."

#SarkarnamaDiwali अंक प्रसिद्ध झाला. येथे क्लिक करा आणि अंक अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात घरपोच मिळवा

संबंधित लेख