How to bring wife for loan waiver? | Sarkarnama

शेतकरी कर्जमाफीसाठी बायको आणायची कोठून? 

महेंद्र शिंदे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी विविध अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करताना काही गमतीही घडत आहे. अशीच गंमत आता बायकोसाठी घडत आहे. ही गंमत वाटत असली तरी संबंधित शेतकऱंयाची धाकधूक मात्र वाढली आहे. 

कडूस : कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांबरोबरच त्याच्या पत्नीचे ठसे घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पण, पत्नी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्याय नसल्याने पात्र शेतकऱ्यांनाही अर्ज भरता येत नाहीत. त्यामुळे ते कर्जमाफीपासून वंचित राहण्याचा धोका आहे. कर्जमाफी मिळविण्यासाठी पत्नी आणायची कोठून? असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

कर्जमाफीस पात्र होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना पत्नीच्या बोटांचे ठसे आवश्‍यक असल्याचे फर्मान सरकारने काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अर्ज भरण्यासाठी आपल्या कारभारणीला तिच्या आधार कार्डसह सोबत आणावे लागत आहे. ज्या शेतकऱ्याची पत्नी अस्तित्वात नाही किंवा ठसा देण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही, त्याला अर्ज भरताना अडचणी येत आहेत.

पत्नी नसलेल्यांसाठी ऑनलाइन अर्जात पर्याय नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अर्ज भरता येत नाहीत. या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. घरातील बहुतांश वयस्कर व्यक्तींच्या नावावर शेती आहे. त्यातील अनेकांच्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अनेक तरुणांच्या नावावर शेती आहे, पण ते अविवाहित आहेत. पती-पत्नीत वाद असल्याने पत्नी नांदत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. पत्नी नसल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. नोंदणी होत नसल्याने असे शेतकरी कर्जमाफी मिळविण्यापासून वंचित राहणार आहेत. कर्जमाफीस पात्र होण्यासाठी पत्नी आणायची कोठून? असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. 

याबाबत कडूस तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्‍यामराव ढमाले म्हणाले, ""माझ्या पत्नीचे निधन झाले आहे. कडूस सोसायटीचे माझ्या नावावर कर्ज आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज सरकारकडून माफ होणार आहे. कर्जमाफीसाठी मी पात्र ठरत असूनही सरकारच्या या निरर्थक व जाचक अटींमुळे मला कर्जमाफी मिळणार नाही. याबाबत मी दाद कोणाकडे मागायची.'' 

रोहिदास बंदावणे, कमल मेदगे आणि पुष्पा गारगोटे या कर्जदार शेतकऱ्यांनीही हीच व्यथा मांडली. 
 

संबंधित लेख