how anddhure became sharp shooter? | Sarkarnama

सेल्समन सचिन अंधुरे बनला `शार्प शूटर`! दाभोलकरांवर नेम धरण्यासाठी शस्त्र प्रशिक्षण

प्रियांका तुपे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अंधुरेने दुचाकीवर पाठीमागे बसलेला असताना दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे एटीएसचा दावा केला आहे. हा अंधुरे एका कापड दुकानात काम करत होता. एक सेल्समन शार्प शूटर कसा काय झाला आणि चालत्या दुचाकीवरून त्याने दाभोलकर यांच्यावर नेम कसा धरला, याबाबतही पोलिस तपास करणार आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंधुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं असून त्याबाबत सध्या सीबीआय कसून तपास करत आहे.

अंदुरेचं हे कर्नाटक कनेक्‍शन दाभोलकरांच्या हत्येच्या मूळ कटापर्यंत घेऊन जाणारं आहे, असं रविवारी अंदुरेला न्यायालयात हजर केल्यावर सीबीआयच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितलं. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.मुजुमदार यांनी अंधुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

रविवारी दुपारी कडेकोट बंदोबस्तात अंधुरेला न्यायालयात हजर केल्यानंतर जवळपास पाऊण तास सीबीआयचे वकील व बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी युक्तीवाद करताना,' अंधुरेला महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याने, या प्रशिक्षणाचं आयोजन नेमकं कोण करत होतं? पैसा व साधने यांचा पुरवठा कोण करत होतं, याबाबत सखोल तपास करायचा आहे. विविध ठिकाणांबाबत अंधुरेकडून माहिती घ्यायची आहे. कटात वापरलेली दुचाकी व शस्त्रं मिळवण्यासाठी अंधुरेची 14 दिवसांची पोलीस कोठडी आवश्‍यक आहे असे न्यायालयाला सांगितले.

वीरेंद्रसिंह तावडे हा कटाचा मुख्य सूत्रधार असून त्याचा व अंधुरेच्या संपर्काबाबत, या कटासाठी किती बैठका घेतल्या. त्या कधी व कोणत्या ठिकाणी पार पडल्या, हत्येच्या कटात सामील असू शकणारे इतर आरोपी आदी बाबींचा तपास सध्या सुरु असल्याचे सीबीआय तपास अधिकार्यांनी सांगितले.

 
आरोपीचे वकील ऍड. प्रकाश सालसिंगीकर यांनी युक्तीवाद करताना, ``अंधुरेबाबतची ही थिअरी आता सीबीआयने नव्याने बनवली असून याआधी तपासात त्यांनी सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावं घेऊन त्यांना फरार घोषित केलं आहे. मारेकऱ्यांची रेखाचित्रे म्हणून सारंग अकोलकर व विनय पवारची नावे घेण्यात आली.  मात्र चार्जशीटमध्ये त्यांची नावे नाहीत. यावरुन सीबीआयच्या दाव्यात विसंगती आहे, हे स्पष्ट होते' असे सांगितले.

यावर सीबीआयच्या वकिलांनी प्रतिवाद करताना सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावे चार्जशीटमध्ये नसली तरी रेखाचित्रामध्ये तयार झालेले चेहरे हे सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्या चेहऱ्यासारखे दिसतात. अकोलकर आणि विनय पवार हेच मारेकरी आहेत, असा सीबीआयचा दावा नसला तरी त्यांची कटातील भुमिकेबाबत तपास सुरु आहे.' असे सांगितले. 

महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये आरोपीने शस्त्र प्रशिक्षण घेतल्यानं आता अंधुरेचे कर्नाटक कनेक्‍शन तपासाला आणखी दिशा देणारं ठरत आहे..असं सूत्रांनी म्हणलं आहे. तसेच अंधुरेचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचंही उघड झाल्याचंही पोलिस सूत्रांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख