A hording wishing happy birthday to suresh Mhatre falls on a teacher | Sarkarnama

ठाण्यात सभापती बाळ्यामामांच्या वाढदिवसाचा बॅंनर कोसळून शिक्षिका जखमी   

दीपक शेलार 
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीवर लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर अचानक खाली कोसळून म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाली. 

ठाणे :  ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या वाढदिवसा निमित्त रस्त्यावर लावण्यात आलेला बॅनर कोसळून नवी मुंबई महापलिकेच्या बालवाडी शिक्षिका जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 7) दुपारी ठाण्यात घडली.

 ज्योती म्हात्रे (43) रा.घणसोली कोळीवाडा, नवीमुंबई असे जखमी शिक्षिकेचे नाव असून त्यांच्यासोबत असलेल्या शेजारील महिला थोडक्‍यात बचावली. याप्रकरणी, शिक्षिकेच्या तक्रारीनंतर ठाणे नगर पोलिसांनी अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई महापलिकेच्या शाळेत बालवाडी शिक्षिका असलेल्या म्हात्रे या गुरुवारी दुपारी ठाणे तहसीलदार कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्या सोबत शेजारी राहणाऱ्या सुरेखा पष्टे (35) या होत्या. पष्टे यांच्या जातीच्या दाखल्यासंबंधी माहिती घेण्यासाठी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरून पायी जात असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीवर लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर अचानक खाली कोसळून म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाली. 

सुदैवाने त्यांच्या सोबत चालणाऱ्या सुरेखा  पष्टे या महिला बचावल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रस्त्यावर जागोजागी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरमुळे ठाणे शहर एकप्रकारे ओंगळवाणे दर्शन घडते.

आता तर, निवडणुकांचा हंगाम नजीक आल्याने शहरात सर्वत्र बेकायदा बॅंनरबाजी स्रुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा बॅंनरबाजांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

संबंधित लेख