home minister is in shivsena , he should withdraw cases against citizens : Neetesh Rane | Sarkarnama

गृहराज्यमंत्री शिवसेनेचे ,जनतेवरील तक्रारी मागे घ्याव्यात : नीतेश राणे

सरकारनामा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सभापती भाजपच्या असल्या तरी त्या जनतेच्या असून, जनतेविरूध्दच तक्रार देणे शोभते का?

- नीतेश राणे

देवगड ( सिंधुदुर्ग ) : " गिर्ये-रामेश्‍वरमधील आंदोलनावेळी शिवसेनेची बघ्याची भूमिका होती. रिफायनरीला विरोध होता तर जनता संघर्ष करताना गृहराज्यमंत्री शिवसेनेचे असताना स्थानिकांवर तक्रारी कशा दाखल होतात? पालकमंत्री शिवसेनेचे असल्याने शिवसेनेला प्रकल्प नको असेल तर जनतेवरील तक्रारी मागे घ्याव्यात," असे  आमदार नीतेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह शिवसेना, भाजपवर टीका केली.

श्री . राणे म्हणाले ," स्थानिक जनतेचा ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध नाही, असे आजवर भासवून प्रकल्पाचे उघडपणे समर्थन करणाऱ्यांना काल स्थानिक जनतेनेच जागा दाखवली. लोकशाहीत हुकुमशाही चालत नाही, हे यातून समोर आले. विरोध असताना प्रकल्प लादू पहाणाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम जनतेनेच केले आहे . "

गिर्ये परिसरात काल (ता.18) घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राणे येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. बाळ खडपे, अमोल तेली, योगेश चांदोस्कर, गणपत गावकर उपस्थित होते. 

राणे म्हणाले, "आपण आज विजयदुर्ग परिसरात असताना स्थानिकांनी आपली भेट घेऊन चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार काही स्थानिकांवर पोलिस कारवाई करणार आहेत. एका बाजूला जठार आणि माजी आमदार ऍड. अजित गोगटे जनता मायबाप असून, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करू नये असे सांगतात, तर दुसरीकडे सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या माध्यमातून जनतेच्याविरूध्दच तक्रारी दिल्या जातात.  असे घाणेरडे राजकारण केले जाते. जनतेला त्रास देण्यासाठी ही मंडळी तेथे गेली होती का? सभापती भाजपच्या असल्या तरी त्या जनतेच्या असून, जनतेविरूध्दच तक्रार देणे शोभते का?''

 "स्थानिकांच्या एकजुटीचे काल दर्शन घडले. प्रकल्प नको म्हणून स्थानिक जनतेने आंदोलन केले. लोकशाही पध्दतीने आपल्या भावना व्यक्‍त करणार असल्याबाबत त्यांनी पोलिसांशी पूर्वी संवादही साधला होता; मात्र शांततेत आंदोलन करूनही त्यांच्यावर तक्रारी झाल्या.'' असेही ते म्हणाले . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख