hit me but stop dishonor to congress : Bagawe | Sarkarnama

मला ठोसे मारा; पण काॅंग्रेसची बदनामी थांबवा : बागवे

उमेश घोंगडे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

पक्षात सातत्याने होत असलेल्या टिकेने काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे वैतागले आहेत. आपला हा वैताग त्यांनी पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत व्यक्त केला. विरोधकांना कधी गोंजारून, कधी गोड बोलून आणि नंतर थेट इशारा देऊन ताळ्यावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी होईल? 

पुणे : ``काॅंग्रेसची पदे मिळूनही पक्षावर टीका करणाराची मी आता गय करणार नाही. अति झाले आहे. सातत्याने माध्यमांकडे जाऊन पक्षाची बदनामी करणे थांबवा. माझ्या शहराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा अपमान यापुढे सहन करणार नाही,`` असा इशारा पुणे शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला.

प्रदेश काॅंग्रेस कार्यकारिणीवर पुण्यातील प्रतिनिधी पाठविण्यावरून पक्षात बराच वाद झाला. सारा वाद माध्यमांपर्यंत पोचला. त्याचे पडसाद साप्ताहिक बैठकीत उमटले. 

``माझे काही चुकत असले तर मला चार ठोसे मारा. मात्र कोणत्याही परिस्थितीत माध्यमाकडे जाऊ नका. त्यातून आपल्याच पक्षाची बदनामी होत आहे. आपण साऱ्यांनी एक दिलाने काम केल्यास नांदेड पॅटर्न पुण्यात आणू शकतो, असा आशावादही बागवे यांनी जागवला. 

शहरातील साऱ्या सहकाऱ्यांनी एकत्र राहावे आणि पक्षासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र आपला वारंवार अपमान होत असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. रमेश बागवेला सोनिया गांधी आणि अशोक चव्हाण यांनी शहराध्यक्ष केले आहे. माझ्याबद्दल काही मंडळींच्या मनात द्वेष आहे. शहर काॅंग्रेस कार्यालयात अनेक मंडळी फिरकतही नाहीत. मग अशांना पदे देऊन उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला. काहींना बैठकीचे एसएमएस पाठविले. तर म्हणतात आम्हाला फोन आला नाही. फोन केला तरी काही जण बैठकीला येत नाही, अशी परिस्थिती त्यांनी मांडली.

शहर पातळीवर पक्षाचे पावणेचारशे पदाधिकारी आहेत. मात्र दैनंदिन कामात केवळ 10-20 पदाधिकारी सहभागी होतात. प्रत्येकाने आपले योगदान दिल्यास पक्षाच्या विस्ताराला मदत होईल. केंद्र व राज्य सरकारविरोधातल्या असंतोषाला वाट करून देण्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

पदापेक्षा पक्ष महत्वाचा आहे या भावनेने काम करा. अध्यक्ष म्हणून मी आज आहे कदाचित उद्या नसेन पण पक्ष कायम आहे. पक्षासाठी प्रत्येकाने काम करण्याची वेळ आज आली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण होत आहे. अशावेळी आपण साऱ्यांनी गट-तट विसरून एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई करण्याची वेळ आली आहे. आपण साऱ्यांनी ठरवले तर पुण्यात नांदेडची पुनरावृत्ती होऊ शकेल, असे आशावाद बागवे यांनी जागविला.

 

संबंधित लेख