उन्हाची काहिली अन्‌ मार्चअखेरचा फटका, बाजारपेठेत शुकशुकाट

 उन्हाची काहिली अन्‌ मार्चअखेरचा फटका, बाजारपेठेत शुकशुकाट

नगर ः नगरच्या बाजारपेठेला मागील पाच वर्षांपासून ग्रहण लागले आहे. दुष्काळाच्या तीव्र तडाख्यात कसेबसे तरलेले व्यापारी नोटाबंदी व ग्रामीण भागातून येणारा ग्राहक तुटल्याने हबकून गेले आहेत. त्यात नोटाबंदी, बदलती कर प्रणाली आणि परीक्षांचा काळ आदींमुळे सध्या बाजारात ग्राहक नाही. प्रत्येक वर्षीच मार्चएण्ड असला, तरी या वर्षी बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यात तापमान 38 अंश सेल्सिअसवर पोचले. परिणामी शुकशुकाट असलेल्या या बाजारपेठेतील व्यापारीही शेतकऱ्यांप्रमाणेच हतबल झाला आहे. 

व्यवहार ठप्प 
बॅंकांमधून होणाऱ्या व्यवहारांवर सरकारने अनेक बंधने लादल्यामुळे व्यापारी थेट बॅंकांत रक्कम भरण्यास टाळत आहेत. साहजिकच वरचेवर व्यवसाय करणारांची संख्या वाढत आहेत. त्याचाच परिणाम रोख देणे-घेणे वाढले आहे. किरकोळ व्यापारी ठोक व्यापाऱ्यांना धनादेश देऊन काही दिवसांची साईट मागत असे. आता मात्र रोखीने व्यवहार होण्यावर बहुतेकांचा भर आहे. जास्त धंदा झाल नाही, तरी चालेल, पण रोख व्यवहार करण्यावर बहुतेक व्यापारी ठाम असल्याने व्यवसायांवर परिणाम होत आहे. त्यात ग्राहक कमी असल्याने व्यवहार ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. 

बॅंकांचा तगादा 
व्यापाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी बॅंकांनी तगादा सुरू केला आहे. बहुतेक बॅंकांचे वसुलीपथक थेट दुकानांवर धडकते. थकलेले व्याज न भरल्यास सील करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे. 

ऑनलाईनचा फटका 
व्यापाऱ्यांना सध्या सर्वात जास्त फटका बसत असेल, तर तो ऑनलाईनचा. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कापड, शूज, ऍक्‍सेसरीज ऑनलाईन खरेदीवर बहुतेकांचा भर असतो. तुलनेत ते स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांचा ट्रेंड बदलतो आहे. त्याचाही परिणाम बाजारपेठेवर होत आहे. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्या मोठ्या असतात. त्या राज्य व देश पातळीवरून काम करीत असल्याने थेट कंपन्यांशी व्यवहार करून मालाचे दर कमी करून घेतात. त्यामुळे साहजिकच शहरातील ग्राहक अशा कंपन्यांकडे आकर्षित होतात. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांवर नफा कमाविण्याऐवजी व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठीच धडपड करण्याची वेळ आली आहे. 

उन्हाची काहिली 
सध्या जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. दुपारी तीव्र उन्हामुळे ग्राहक बाजारपेठेत फिरकत नाहीत. दुपारी एक ते चारपर्यंत बाजारपेठ एकदम शांत होते. सायंकाळीही ग्राहक कमी बाहेर पडतात. त्याचाही परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. दरवर्षी मेमध्ये ही स्थिती निर्माण होते. या वर्षी मात्र मार्चमध्येच उन्हाचा तडाखा बसला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com