जोशी -शेट्टी ते खोत: शेतकरी संघटनेचा  इतिहास फुटीचाच !

भाजपने राजू शेट्टी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले नाही तेंव्हाच खरे तर राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रात देखील सत्तेत सहभागी होणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी होती .त्यानंतर भाजपने राज्यात संघटनेला मंत्रीपद देऊन फुटीची बीजे पेरली . वैयक्तिक महत्तवाकांक्षा , गैरसमज , आणि आणि ईर्ष्या या खतांच्या जोरावर दुहीची पीक पाहता फाटा बहरले .
shetkari sanghatna
shetkari sanghatna

कोल्हापूर :  चळवळ मग ती शेतकऱ्यांच्या प्रश्‍ना उभी राहीलेली असो किंवा अन्य कोणत्याही प्रश्‍नावर त्यात फुटीची बीजे ही रोवलेलीच असतात.

शेतकरी संघटनेचा गेल्या 15-20 वर्षातील इतिहास पाहीला शेतकरी प्रश्‍नांवर मोठे झालेले नेते सत्तेसोबत गेल्यानंतर संघटनेत गटबाजी आणि त्यातून फूट ही झालेलीच  आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशावरून फुटीची ही परंपरा   कायम राहणार असल्याचे दिसत आहे. 


वीस वर्षापुर्वी देशपातळीवर सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या शरद जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली एकच शेतकरी संघटना होती.

सद्याचे "स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत हे पश्‍चिम महाराष्ट्रीतल या संघटनेचे शिलेदार होते. मराठवाडा, विदर्भात संघटनेचा झेंडा लक्ष्मण वडले, महिला आघाडीच्या डॉ. शोभाताई वाघमारे यांच्या खांद्यावर होता.

 श्री. जोशी यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. श्री. शेट्टी यांना हा निर्णय आवडला नाही. जातीयवादी पक्षांसोबत जाणारे शेतकरी नेतृत्त्व कधीही शेतकऱ्यांचे नसते असे सांगत श्री. शेट्टी यांनी "स्वाभिमानी' शेतकरी संघटनेची स्थापना पश्‍चिम महाराष्ट्रात केली. 


श्री. शेट्टी यांच्यासोबत सुरूवातीच्या काळात रघुनाथदादा पाटील हेही होते, पण त्या दोघांतच मतभेद झाले आणि श्री. पाटील यांनी स्वतःच्या नेतृत्त्वाखालील आणखी एक संघटना काढली. त्यामुळे "स्वाभिमानी' त श्री. शेट्टी व सदाभाऊ हे दोघेच नेते राहीले. श्री. वडले, डॉ. वाघमारे गेल्या दहा-बारा वर्षात कोठे आहेत याचा पत्ता नाही. 


शरद जोशी यांच्या भाजपा पाठिंब्याला विरोध करणारे श्री. शेट्टी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत राहीले. याची बक्षिसी म्हणून राज्यात त्यांच्या संघटनेला राज्यमंत्री पद बहाल केले. या पदावर श्री. खोत यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून शेट्टी-खोत यांच्यातील मतभेद सुरू झाले. 

अलिकडे ते चव्हाट्यावरच आल्यासारखी परिस्थिती आहे. शेतकरी प्रश्‍नावर सरकारला सळो की पळो करून सोडणारे हे दोन नेते कधी एकमेकांवर तुटुन पडतील याचा अंदाज नाही एवढे टोकाचे मतभेद या दोघांत निर्माण झाले आहेत. सरकारच्यादृष्टीने ही जमेची बाजू आहे. संघटना कोणतीही असली तरी त्यात फूट पडली कि ताकद कमी होते.

 म्हणूनच  राज्यकर्त्यांनीही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू पाहणाऱ्या श्री. शेट्टी यांच्याकडे दुर्लक्ष करून श्री. खोत यांना जवळ करायला सुरूवात केली. श्री. खोत यांचे पुत्र सागर हे भाजपामध्ये लवकरच जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता स्वतः श्री. खोत हेच भाजपात जाणार हे निश्‍चित आहे. भाजपानेही यानिमित्ताने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

 श्री. खोत यांना पक्षात शेतकरी, ग्रामीण चेहरा पक्षाला मिळवण्याचा प्रयत्न करताना श्री. शेट्टी यांना पश्‍चिम महाराष्ट्रातून मिळणारी रसद रोखता येईल असा भाजपाचा डाव आहे. यातून शेतकरी, त्यांचे प्रश्‍न व त्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात जनाधार 

पश्‍चिम महाराष्ट्रात श्री.शेट्टी यांना चांगलाच जनाधार मिळाला. त्यांची आक्रमक भाषणे, सरकारवर तुटुन पडण्याची प्रवृत्ती आणि परिणामाची चिंता न करता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई करण्याची पध्दत यामुळे ते अल्पावधीच लोकप्रिय झाले. या जोरावरच ते जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार झाले, आमदारकीचा कार्यकाल शिल्लक असताना खासदार झाले. स्वाभिमानी' शेट्टी-खोत ही जोडी म्हणजे "सर्जा-राजा' ची जोडी असे महाराष्ट्रभर ओळख झाली.

 पण वैयक्तिक महत्वाकांक्षा संघटनेपेक्षा मोठ्या झाल्याने संघर्ष सुरु झाला . भाजपने राजू शेट्टी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले नाही तेंव्हाच खरे तर राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रात देखील सत्तेत सहभागी होणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी होती .

त्यानंतर भाजपने राज्यात संघटनेला मंत्रीपद देऊन फुटीची बीजे पेरली . वैयक्तिक महत्तवाकांक्षा , गैरसमज , आणि आणि ईर्ष्या या खतांच्या जोरावर दुहीची पीक पाहता फाटा बहरले . पीक कंपनीला येताच भाजपने आता कापणीचे मनावर घेतले . दोन मित्रांच्या संघर्षात संघटनेचे मात्र वेगाने सुरु झाले आहे . 
............... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com