hire family bjp leader met them in nashik | Sarkarnama

हिरे कुटुंबीयांची आता भाजपकडून मनधरणी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

मालेगाव : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी (ता. 20) नाशिक येथील महात्मानगर भागातील माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

डॉ. भामरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेल्या हिरे कुटुंबीयांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश मिळाले की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे; परंतु हिरे कुटुंबीयांच्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सहा महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेल्या हिरे कुटुंबीयांनी मध्यंतरी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची व हिरे परिवाराची भेट चर्चेची ठरली होती. यानंतर माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या प्रवेश सोहळ्याची 2 ऑगस्ट ही तिथी निश्‍चित झाली होती. मराठा आरक्षण आंदोलनामुळे प्रवेशसोहळा लांबल्याचे हिरे समर्थकांकडून सांगण्यात आले. यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही महिन्यापूर्वी हिरे परिवाराची भेट घेऊन त्यांना शिवसेनेत येण्याचे आवतन दिले. 

या घडामोडींमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. हिरे कुटुंबीय भाजपपासून दुरावल्यास जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्‍यता होती. त्यामुळे हिरेंचे मन वळविण्याचा प्रयत्न महिन्यापासून सुरू होता. दरम्यान, आजच्या घडामोडींमुळे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला.

डॉ. भामरे यांनी हिरे कुटुंबीयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी भेटी घालून देत तुमचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितल्याचे समजते. माजी आमदार अपूर्व हिरे यांनी डॉ. भामरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी मंत्री हिरे व अपूर्व व अद्वय हिरे यांच्याशी डॉ. भामरे यांनी तासभर गोपनीय चर्चा केली. या संदर्भात अपूर्व व युवानेते अद्वय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  

संबंधित लेख