"आशा' कार्यकर्ती ते जिल्हा परिषद अध्यक्षा !

शिवराणी नरवाडे
शिवराणी नरवाडे

हिंगोली ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कामावर आधारित मोबदला या धर्तीवर आशा स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या शिवराणी नरवाडे यांचा जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास अनेकींसाठी प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा गटातून निवडून आलेल्या शिवराणी प्रकाश नरवाडे यांची अगदी शेवटच्या क्षणी निवड झाली. 


जिल्हा परिषदेच्या बदललेल्या राजकारणात शिवसेनेकडे अध्यक्षपद येणार हे निश्‍चित असतानाच अध्यक्षपदाची दावेदारी मात्र, पक्षातीलच इतर सदस्यांनी केली होती. या सदस्यांचा जिल्हा परिषदेचा पूर्वानुभव व राजकीय ज्येष्ठता पाहता या सदस्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनपेक्षितपणे व शिवसेना पक्षांतर्गत 
स्पर्धेतून अचानक शिवराणी नरवाडे यांचे नाव निश्‍चित झाले व अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 

या प्रकारामुळे पक्षांतर्गत अनेक पदाधिकाऱ्यांना उसने अवसान आणून आनंद साजरा करावा लागला हे विशेष. शिवराणी नरवाडे या गृहिणी म्हणून काम करीत असतानाच त्यांनी 2005 पासून घर सांभाळून उरलेल्या वेळात समाजोपयोगी कामे करावीत, या हेतूने कामावर आधारित मोबदला या धर्तीवर आशा स्वयंसेविका म्हणून काम सुरू केले. गावातील आरोग्य विभागांतर्गत सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, कुटुंब कल्याण, लसीकरण, पल्स पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग, गरोदर मातांची सरकारी संस्थांमधून बाळंतपण करून घेणे, महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देणे या उपक्रमांतर्गत त्यांनी गेल्या 12 वर्षांपासून काम केले आहे. 

आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी गावात व विशेषतः महिला वर्गात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळाली व त्या निवडूनही आल्या. अध्यक्षपदाच्या शर्यतीत कुठेही नसताना शेवटच्या क्षणी अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 
शिवराणी नरवाडे या सुशिक्षित असून त्यांना समाजकारण, शासकीय कामकाजाचा अनुभव आहे. गावपातळीवर केलेल्या कामाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे त्यांना आता अध्यक्ष म्हणून काम करताना अडचणीही जाणवणार आहेत.

त्यातच त्यांचे वत्कृत्व ही चांगले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने अध्यक्षपदापर्यंत मला पोहचता आले, याचे समाधान असून आपण गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी काम करणार असून जास्तीत जास्त वेळ समाजकार्यासाठी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com