हिंगोलीतून सातवांना टक्कर देण्यासाठी सेना-भाजप इच्छुकांची गर्दी

राज्यासह देशभरात 2014 मध्ये निर्माण झालेल्या मोदी लाटेतही हिंगोली लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा झेंडा रोवण्यात खासदार राजीव सातव यशस्वी ठरले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे सज्ज झाले आहेत. शिवसेनेला हिंगोलीचा गड पुन्हा कॉंग्रेसकडून खेचायचा आहे, तर भाजपला मित्रपक्षाला रोखत इथे कमळ फुलवायचे आहे.
hingoli-loksabha
hingoli-loksabha

हिंगोली :   राज्यासह देशभरात 2014 मध्ये निर्माण झालेल्या मोदी लाटेतही हिंगोली लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा झेंडा रोवण्यात खासदार राजीव सातव यशस्वी ठरले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत  त्यांच्याशी दोन हात  करण्यासाठी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे सज्ज झाले आहेत. शिवसेनेला हिंगोलीचा गड पुन्हा कॉंग्रेसकडून खेचायचा आहे, तर भाजपला मित्रपक्षाला रोखत इथे कमळ फुलवायचे आहे.

शिवसेनेकडून नांदेडचे आमदार हेमंत पाटील, वसतमचे जयप्रकाश मुंदडा यांच्यासह डॉ. बी.डी. चव्हाण निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे समजते. तर भाजपकडून माजी खासदार शिवाजी माने, सुर्यकांता पाटील व सुभाष वानखेडे सातव यांच्याशी दोन हात करण्याच्या तयारीत आहेत.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील 48 पैकी केवळ हिंगोली व नांदेड या दोन मतदारसंघात कॉंग्रेसला अनुक्रमे राजीव सातव व अशोक चव्हाण यांच्या रूपाने विजय मिळवता आला होता. त्यामुळे राज्यात कॉंग्रेसची लाज राखली गेली अशी चर्चा त्यावेळी झाली होती.

हिंगोलीत राजीव सातव यांना अवघ्या 1629 मतांनी विजय मिळाला असला तरी ज्या मोदी लाटेत त्यांनी तो मिळवला त्याला अधिक महत्व दिले गेले. शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा सातव यांनी पराभव केला होता. हातातोडांशी आलेला घास हिरावल्यामुळे शिवसेना या पराभवाची परतफेड करण्यास उत्सूक आहे.

1977 ते 2014 पर्यंतच्या लोकसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर सर्वप्रथम जनता पार्टी आणि त्यानंतर पाचवेळा कॉंग्रेस व चारवेळा शिवसेनेने हिंगोली मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. राष्ट्रवादीला 2004 मध्ये सुर्यकांता पाटील यांच्या रुपाने एकमेव विजय मिळाला होता. कॉंग्रेस आणि शिवसेनेचे या मतदारसंघावर सातत्याने प्राबल्य राहिले.

मुंदडा, पाटील यांची सेनेकडून दावेदारी

आगामी विधानसभा, लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने पक्ष निरीक्षकांमार्फत मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी हदगांव, वसमत शिवसेना, कळमनुरी, उमरखेड कॉंग्रेसकडे तर किनवट व हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादी, भाजपच्या ताब्यात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील हदगांव आणि किनवट विधानसभा मतदारसंघ हिंगोलीत येत असल्याने नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार हेमंत पाटील हिंगोलीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोलले जाते. या शिवाय वसमतचे शिवसेना आमदार व माजी मंत्री जयप्रकाश मुदंडा हे देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या शिवाय मतदारसंघातील वंजारा समाजाची ताकद लक्षात घेता डॉ. बी.डी. चव्हाण यांनी देखील शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

भाजपला शिवसेनेतून आलेल्यांचा आधार

हिंगोली विधानसभेतील एक आमदार वगळता भाजपची जिल्ह्यात फारशी ताकद नाही. परंतु शिवसेनेकडून खासदार राहिलेले आणि नंतर पराभूत झालेले दोन माजी खासदार सध्या भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ऍड. शिवाजी माने, सुभाष वानखेडे हे दोघेही 2019 मध्ये भाजपकडून लढण्याची शक्‍यता आहे. शिवाजी माने यांनी दोनवेळा तर सुभाष वानखेडे यांनी एकदा हिंगोलीचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

सुभाष वानखेडे यांचा राजीव सातव यांनी पराभव केल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील या देखील सध्या भाजपच्या गोटात सामील झाल्या असून त्यांनीही लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर भारिप, बसपा देखील हिंगोलीतून स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेस जागा राखणार?

देशभरात मोदी यांचा प्रभाव असतांना हिंगोली लोकसभेची जागा कॉंग्रेसने राखल्यामुळे या मतदारसंघाचे नाव देशपातळीवर गाजले होते. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून राजीव सातव ओळखले जातात. या विश्‍वासातूनच राहूल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत सातव यांच्यावर अनेक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजयकुमार रूपाणी यांच्या राजकोट मतदारसंघात राजीव सातव यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीमुळे राजीव सातव तेव्हा प्रकाशझोतात आले होते.

आगामी 2019 मध्ये कॉंग्रेस राजीव सातव यांना उमेदवारी देऊन हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्याच्या तयारीत आहे. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढली तर मतांचे ध्रुवीकरण कॉंग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याने हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या मार्गात सध्या तरी कुठलाही अडथळा नाही. शिवाय राज्य व केंद्रात सत्ता असलेल्या भाजप सरकार विरोधातील वातावरण देखील कॉंग्रेसचा विजय सुकर करू शकते. शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव, जिल्ह्यातील रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायम असल्याने मतदारांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल चीड असल्याचे बोलले जाते.

विरोधी पक्षाचा खासदार म्हणून केंद्र आणि राज्याने मतदारसंघात निधी देतांना हात आखडता घेतला त्याचा परिणाम देखील जिल्ह्याच्या विकासकामांवर झाल्याची ओरड कॉंग्रेसकडून सातत्याने केली जाते. लोकसभा निवडणूक प्रचारात हाच मुद्दा कॉंग्रेस पुढे करू शकते. नांदेड-वाघाळा महापालिकेतील विजयाने कॉंग्रेसला राज्यात बळ मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा आणि राज्यस्थान, पश्‍चिम बंगाल मधील पोटनिवडणुकात भाजपला जोरदार झटका बसला. त्यामुळे देशात बदलाचे वारे सुरू झाल्याची देखील चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com