highcourt order about mangalwar lake | Sarkarnama

उदयनराजे बोलले तसे आता घडणार नाही! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी पसरली आहे.

सातारा : नेहमीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पाठीशी या ना त्या कारणांनी ठामपणे उभे राहणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना आज मोठ्या अपयशास सामोरे जावे लागले आहे. गणेशोत्सवाच्या सुरवातीलाच ध्वनीक्षेपकांवर बंदी आणि मूर्ती विसर्जनाबाबत न्यायालयाने पूर्वीचाच निर्णय कायम ठेवल्याने जिल्हा प्रशासनाने उदयनराजेंनी घेतलेल्या भुमिकेविरोधात जाऊन ध्वनीक्षेपकांची जप्ती करण्याची भूमिका घेत मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी केली आहे. 

सातारा विकास आघाडीची सत्ता असलेल्या सातारा पालिकेने गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मंगळवार तळे खुले करावे, याबाबत उच्च न्यायालयात नुकतीच याचिक दाखल केली. परंतू उच्च न्यायालयाने ही याचिका निकालात काढताना पूर्वीच्या निर्णयात कोणताही बदल करण्याची आवश्‍यकता नसल्याचे म्हटले आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्याबाबत आग्रह धरलेला असतानाच उच्च न्यायालयाने एक सप्टेंबर 2015 चा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी केली आहे. त्याऐवजी पालिकेचे जलतरण तलाव, गोडोली तळे आणि कण्हेर धरणाजवळील खाणीत विसर्जनाचा पर्याय ठेवला आहे. तरीही गणेश मंडळे मात्र, मंगळवार तळ्यासाठीच आग्रही राहिले आहेत. 

रविवारी (ता. 9) एका गणपती मंडळाच्या गणेशमूर्ती आगमनावेळी खासदार उदयनराजे यांनी आवाजाची भिंत (ध्वनीक्षेपक) वाजलीच पाहिजे, अशी आरोळी ठोकली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी साताऱ्यात येऊन गणेशोत्सव मंडळांनी शिस्त पाळावी, ध्वनीक्षेपक मोठ्या आवाजात वाजवू नयेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्यानंतर सलग तीन दिवस साताऱ्यात सुरू असलेल्या शांतता समितीच्या बैठकीतही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिसअधीक्षक पंकज देशमुख यांनीही गणेशोत्सव हा सामाजिक ऐक्‍याचा सण आहे. हा उत्सव सर्वांनी आनंददायी साजरा करावा, कायदा व शिस्त पाळावी असे आवाहन करत कारवाईचा ही बडगा उचलला जाईल, असा इशारा ही दिला. 

त्यातच आज जिल्हा प्रशासनाने मंगळवार तळ्याबाबतची भुमिका जाहीर करून अन्य तीन तळी उपलब्ध असतील. ज्यांना ज्या ठिकाणी विसर्जन करायचे आहे, त्यांनी तेथे विसर्जन करावे असे स्पष्ट केल्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी पसरली आहे. एकीकडे ध्वनीक्षेपकास पूर्णत: बंदी तर दुसरीकडे मंगळवार तळ्याबाबतचे अपयश यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटास धक्का बसला आहे. 

संबंधित लेख