hemant godase in delhi | Sarkarnama

राज्यातल्या विमानसेवेसाठी खासदार गोडसेंचे दिल्लीत आंदोलन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

यासंदर्भात राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मंत्री पाटील यांनीही या संस्थेशी पत्रव्यवहार केला. मात्र त्या पत्रांनाही प्रतिसाद मिळाला नाही. यासंदर्भात मंत्री पाटील यांनी "जीव्हीके' कंपनीला खडसावले पाहिजे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही अशी खंत खासदार गोडसे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले होते. 

नाशिक : महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरोधात अनेकदा आंदोलन होतात. त्यात नवे काहीच नाही. मात्र महाराष्ट्रातील "उडान' सेवेतील विमानसेवेसाठी आज खासदार हेमंत गोडसे यांनी थेट दिल्लीत आंदोलन केले. नाशिकसह राज्यातील संस्थांनी त्यांना केवळ तोंडी पाठींबा दिला. मात्र गोडसेंच्या मदतीला आले उत्तर भारतीय कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा देण्याचे आश्‍वासन पदरात पडले आहे. 

खासदार गोडसे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकराला विमान उड्डयन सचिवांच्या कार्यालयात आंदोलन करीत घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे उत्तर भारत प्रमुख विनय शुक्‍ला, नीरज शेट्टी, उत्तर प्रदेश प्रमुख अनिलसिंग, पंजाब प्रमुख योगीराज सिंग, बिहार प्रमुख कौशलेंद्र शर्मा, हरियाना संपर्क प्रमुख पठानीया व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यानंतर सचिवांना खासदार गोडसे यांनी पत्र देऊन प्रमुख पादधिकाऱ्यांसह चर्चा केली. "जीव्हीके' कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. 

गुुजरातच्या विमानसेवेला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्रातील विमानसेवेला स्लॉट नाकारणाऱ्या "जीव्हीके' कंपनीवर कारवाईसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज दिल्लीत आंदोलन केले. या आंदोलनाला गुजरात विरुध्द महाराष्ट्र असे स्वरुप प्राप्त झाल्याने राजकीय संघटनांत उत्सुकता होती. नाशिकच्या उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसीएशनचे (निमा) अध्यक्ष मंगेश पाटणकर, अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसीएशनचे (आयमा) अध्यक्ष राजेंद्र अहिरे, राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीअँड ऍग्रीकल्चरलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी या आंदोलनाला पाठींबा जाहिर केला. मात्र विविध संघटनांनी खासदार गोडसेंच्या समर्थनार्थ पत्रक काढण्यापलिकडे काहीही केले नाही. 

यासंदर्भात राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मंत्री पाटील यांनीही या संस्थेशी पत्रव्यवहार केला. मात्र त्या पत्रांनाही प्रतिसाद मिळाला नाही. यासंदर्भात मंत्री पाटील यांनी "जीव्हीके' कंपनीला खडसावले पाहिजे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही अशी खंत खासदार गोडसे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले होते. त्यामुळे दिल्लीपुढे हतबल होण्याचा प्रसंग नवा नाही मात्र यावेळी थेट आंदोलनाचा झेंडा फडकवण्याचा प्रसंग क्वचितच घडतो. तसा आज घडला. 

संबंधित लेख