He Ran Away from polling booth | Sarkarnama

सरकारी यंत्रणेला धडा शिकवण्यासाठी  त्याने तीनच बटने दाबून काढला पळ

जयसिंग कुंभार 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

या मतदाराने केंद्रात जाऊन तीन उमेदवारांना मतदान केले. मात्र पुढचे मतदान न करताच तो पळाला. चार गटात चार वेळा बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रियाच पुर्ण होत नाही. त्यामुळे यंत्र बंद न पडता तसेच सुरु राहिले. आता चौथे मतदान करायचे कोणी हा प्रश्‍न सर्वांना पडला.

मिरज : सरकारी काम सहा महिने थांब असा खाक्‍या असतो. ताटकळणे काय असते याचा अनुभव सरकारी यंत्रणेलाही यावा यासाठी येथील खामकर नामक मतदाराने आज निवडणूक यंत्रणेला चांगलाच धडा शिकवला. या पठ्ठयाने आज सकाळी दहा वाजता येथील प्रभाग क्रमांक चार च्या आयडियल इंग्लिश स्कुल शाळेतील मतदान केंद्रात जाऊन तीनच उमेदवारांना मतदान केले आणि केंद्रातून पळ काढला. त्यामुळे सुमारे अर्धा तास यंत्र मध्येच थांबले. 

शेवटी त्याला पोलिसांनी घरी जाऊन शोधून आणले आणि मतदान करण्यास सक्तीने भाग पाडले. सरकारी व्यवस्थेचा निषेध म्हणून या महाभागाने हे कृत्य केले. मात्र, त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि यंत्रणेची मोठी पळापळ झाली. 

याबाबतची अधिक माहिती अशी या मतदाराने केंद्रात जाऊन तीन उमेदवारांना मतदान केले. मात्र पुढचे मतदान न करताच तो पळाला. चार गटात चार वेळा बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रियाच पुर्ण होत नाही. त्यामुळे यंत्र बंद न पडता तसेच सुरु राहिले. आता चौथे मतदान करायचे कोणी हा प्रश्‍न सर्वांना पडला. मतदार यादीतून त्याचा पत्ता शोधून पोलिस त्याच्या घरी गेले. त्यावेळी हे महाशय दात घासत बसले होते. 

पोलिस घरी आल्यावर त्यांनी मला स्वच्छतागृहात जायचे आहे असे सांगितले. शेवटी स्वच्छतागृहाच्या दारात पोलिस पाळत ठेवून बसले. तो बाहेर आल्यावर तुला काय सांगायचे ते निवडणूक अधिकाऱ्यांना सांग, असे सांगत कसेबसे त्याला मतदान केंद्रावर आणले. तोपर्यंत केंद्राबाहेर भली मोठी रांग लागली होती. हे महाशय पोलिस गराड्यात हलत डुलत आले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना तुम्ही सरकारी काम करताना किती लोकांना ताटकळत ठेवता याचा जाणीव आता तुम्हाला झाली का, असा सवाल केला. मतदारांनी त्याला गयावया करून मतदान करण्यास भाग पाडले. त्याने मतदान केले आणि मग पुढे मतदान प्रक्रिया पुढे सुरु झाली. दरम्यानच्या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून नव्या मतदान यंत्राच्या जुळणीलाही कर्मचारी लागले होते. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख