पहाटे सहापासून गर्दी, मुश्रीफांकडूनच जास्त पाठपुरावा ...

पहाटे सहापासून गर्दी, मुश्रीफांकडूनच जास्त पाठपुरावा ...

कोल्हापूर : माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या मी तोंडाकडे बघत नाही तर पायाकडे बघतो. तो कोणत्या पक्षाचा, जातीचा याचा विचार करत नाही, हे प्रतिपादन आहे राष्ट्रवादीचे कागल विधानसभा मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ यांचे. त्यांचे निवासस्थान, जिल्हा बॅंक आणि विश्रामगृहे हिच त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचे हक्काचे ठिकाण. स्वतंत्र असे कार्यालय नाही किंवा वेगवेगळ्या कामासाठी पीए अशी नाही. 

ते ज्यावेळी निवासस्थानी असतील त्यावेळी पहाटे सहा वाजताच त्यांचा दरबार सुरू होतो. त्यांना भेटण्यासाठी मतदार संघातील लोकांची रांग घराबाहेर लागलेली असते. एका खोलीत स्वतः श्री. मुश्रीफ बसलेले असतात. काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्याने काम सांगितले की ते कोणाकडे आहे ते बघून त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला फोन लावायचा, माझा कार्यकर्ता आहे, काम शक्‍य असेल तर करा असे सांगायचे हा त्यांचा ठरलेला शिरस्ता. भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना आत सोडण्यासाठी इम्रान नायकवडी व मुन्ना शेख बाहेर थांबलेले असतात. 

कोणाला पत्र हवे असेल तर एक टायपिस्ट आणि टाईपरायटरही घराच्या व्हरांड्यात तयार असतो. पहाटे सहा ते नऊ वाजेपर्यंत हा दरबार सुरू असतो, त्यानंतर आंघोळ व पुन्हा कोणी भेटायला आले तर त्यांची भेट घेऊन पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी ते तयार असतात. आज ते फक्त आमदार आहेत, पण कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सलग 12 ते 13 वर्षे ते मंत्री होते. मंत्री असतानाही त्यांच्या या दिनचर्येत कधी फरक पडला नाही. मतदार संघाबाहेरील लोकांना भेटण्यासाठी ते जिल्हा बॅंक किंवा विश्रामगृहावर उपलब्ध असतात. 

मंत्रिपदाच्या काळात त्यांनी मतदार संघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील असंख्य लोकांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यालयातील निम्मा स्टाफ याच कामासाठी जुंपला होता. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीही अशाच लोकांची गर्दी नेहमी असायची. लोकांची कामे करत असताना जे काम होणार नाही त्याबाबत ते स्पष्टपणे सांगतात, पण होणारे काम असेल तर त्याचा पाठपुरावा संबंधितांपेक्षा श्री. मुश्रीफ यांच्याकडूनच जास्त होतो. मोबाईलवर आलेला प्रत्येक फोन ते घेतात हे त्यांच्या कामाचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यांनी फोन उचलला नाही तर मुन्ना किंवा इम्रान यांच्याकडून प्रतिसाद असतोच, पण नंतर फोन केलेल्याला संपर्क साधून त्याचे काम काय हे जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना फोन केला आणि त्याला प्रतिसाद मिळाला नाही अशी तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कधी ऐकायला मिळत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com