Hasan Mushriff targets Samarjitsinh Ghatge | Sarkarnama

मुश्रीफांचा घाटगेंना टोला : आम्ही नसताना तुम्ही बॅंकेत आलेच कशाला ?

निवास चौगले: सरकारनामा वृत्तसेवा 
बुधवार, 15 मे 2019

आसुर्लेकरांना रोखले 
याच प्रश्‍नावर माजी आमदार के. पी. पाटील यांनीही आपले मत मांडले. पण संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच श्री. मुश्रीफ यांनी त्यांना रोखले. "तुम्ही काय बोलू नका,' असे श्री. मुश्रीफ म्हणाले. 

कोल्हापूर : " माझ्यासह संचालकांचा सिक्किम दौरा हा पुर्वनियोजित होता, तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती, माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी 14 मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय ? आम्ही असताना का आला नाही ? अशा गोष्टीत पुढे यायला नैतिक धाडस लागते", अशी टिका  जिल्हा बॅंकेचे संचालक आमदार हसन मुश्रीफ यांनी 'म्हाडा-पुणे' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना त्यांचे नांव न घेता केली . तसेच   'वेड्या बाईल सासर काय आणि माहेर काय' असा टोलाही त्यांनी लगावला . 

दोन दिवसापुर्वी अपात्र कर्जमाफी ठरलेल्या शेतकऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कर्ज द्यावे या मागणीसाठी श्री. घाटगे यांनी मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर देताना श्री. मुश्रीफ म्हणाले,"या शेतकऱ्यांचा एवढा कळवळा होता तर निकाल लागल्यानंतर लगेच का आला नाही ? आम्ही जिल्ह्याबाहेर असतानाच बॅंकेवर मोर्चा का काढला ? बॅंकेविरोधात प्रसारमाध्यमांकडे जाऊन बॅंकेची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. आम्ही असताना या विषयावर चर्चेसाठी आला असता तर त्याची उत्तरेही दिली असती, आता त्यांच्याशी या विषयावर चर्चा नाही. राजकीय अंगाने तो फार मोठा माणूस आहे.'' 

या मोर्चाला आणि अपात्र कर्जमाफीच्या विषयाला विधानसभेची किनार आहे का ? या प्रश्‍नावर श्री. मुश्रीफ म्हणाले," तुम्ही जो काही अर्थ काढायचा तो काढा. आम्ही शेतकऱ्यांसाठी तुरूंगातसुध्दा जाऊ.''

या प्रश्‍नावर सहकार मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे श्री. घाटगे यांनी सांगितले आहे, यावर बोलताना श्री. मुश्रीफ म्हणाले,"या दोघांना भेटल्यानंतर पालकमंत्र्यांनी अपात्र कर्जमाफीची रक्कम व त्यावरील शासनाच्या तिजोरीतून द्यावे, त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करू. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बॅंकेला पैसे मिळाले की ही रक्कम शासनाला आम्ही परत करू.' 

या पत्रकार बैठकीला संचालक भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अनिल पाटील, असिफ फरास, माजी आमदार के. पी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने आदि उपस्थित होते.   
 

संबंधित लेख