hasan mushriff rakshabandhan | Sarkarnama

कृतज्ञतेचे "रक्षा'बंधन : आमदार हसन मुश्रीफ झाले भाऊ ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 50 हून अधिक लहान मुलांवर मुंबई येथे अवघड शस्त्रक्रिया व औषधोपचार विनामूल्य करण्यात आले. आपली मुले सुखरुप घरी आली अशा भावना घेऊन "त्या' बालकांच्या माता पालकांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून आमदार मुश्रीफ यांना भाऊ मानून राखी बांधली. 

कोल्हापूर : असे म्हणतात, तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात, प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणून काही माणसे क्षणभर नव्हे तर आयुष्यभर लक्षात राहतात. अशीच काहीशी अवस्था कागल येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जमलेल्या काही कुटुंबामध्ये होती. श्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 50 हून अधिक लहान मुलांवर मुंबई येथे अवघड शस्त्रक्रिया व औषधोपचार विनामूल्य करण्यात आले. आपली मुले सुखरुप घरी आली अशा भावना घेऊन "त्या' बालकांच्या माता पालकांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून आमदार मुश्रीफ यांना भाऊ मानून राखी बांधली. 

राधानगरी येथे भंगार गोळा करणाऱ्या धनाजी गोसावी यांचा सात वर्षाचा मुलगा राहूल गाडीवरुन पडला. त्याचे दोन्ही पाय फॅक्‍चर झाले. अशा परिस्थित करायचे काय, अशी स्थिती होती. काहींनी आमदार मुश्रीफ यांचे नाव त्यांना सांगितले. मुश्रीफ यांनीही त्याच्या भावना ओळखून मुंबई येथे उपचारासाठी पाठविले. पाय वाकडे झालेला हा मुलगा आज आपल्या पायांनी मुश्रीफ यांच्या प्रांगणात इकडे तिकडे फिरत होता. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. अशी अवस्था कसबा ठाणे (ता.पन्हाळा) येथील अपूर्वा सागर पाटील या मुलीच्या पालकांची होती. शेतकरी असलेले हे कुटुंबीय आपल्या मुलीच्या आजाराने भयभीत झाले होते. कारण अपूर्वाचे हृदय डाव्या नव्हे तर उजव्या बाजूला होते. शुध्द अशुध्द रक्‍यवाहिनी एकत्र होती. झडपेला छिद्र होते. अशा अवस्थेत आमदार मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून मुंबई येथे कोकिळाबेन रुग्णालयात तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम मुश्रीफ यांनी केल्याचे सागर पाटील सर्वांना सांगत होते. तर अवचितवाडी (ता.कागल) येथील 15 दिवसाच्या मुलावरही यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. अशा अनेक लहान मुलांना जीवदान मिळाल्याच्या भावना उपस्थित पालकांमधून व्यक्त होत होत्या. 
 

संबंधित लेख