Hasan Mushrif targets samarjitsinh Ghatge | Sarkarnama

राजे माझ्या स्वप्नात आले अन म्हणाले ,शाहू कारखान्यात बरं नाही चाललं :  मुश्रीफ

सदानंद पाटील 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

समरजितसिंह घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्यात सातत्याने फैरी झडत आहे.

कोल्हापूर : " आदरणीय राजे विक्रमसिंहजी घाटगे हे माझ्या स्वप्नात आले व त्यांनी शाहू कारखान्यात जे काही चाललं आहे ते माझ्या तत्वाच्या विरोधात असल्याचे सांगितले. त्यामुळेच आज आपण शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजेरी लावली ,"असा  टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी  कारखान्याचे चेअरमन व पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना दिला. 

आमदार मुश्रीफ आणि शाहू कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांचे राजकीय वैर आहे.आज आमदार मुश्रीफ चेअरमन असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सभा होती. ही सभा आटोपून आमदार मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे चेअरमन असलेल्या शाहू सहकारी साखर कारखान्याच्या सभेला उपस्थिती लावली. मोठ्या लवाजम्यासह मुश्रीफ सभेला दाखल झाल्याने घाटगे समर्थकांमध्येही चुळबूळ झाली. 

घाटगे गटाचे कार्यकर्ते पाहिल्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी आपल्या नेहमीच्या पध्दतीने घाटगे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, "राजे के आत्मा ने मुझे बुलाया है. आदरणीय राजे विक्रमसिंहजी घाटगे माझ्या स्वप्नात आले व ते म्हणाले, शाहू साखर कारखान्यात जे काही चाललं आहे ते माझ्या तत्वाच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मी या ठिकाणी येवून हजेरी लावली ," असे  त्यांनी कार्यकर्त्यांकडे पाहत  स्पष्ट केले. 

समरजितसिंह घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्यात सातत्याने फैरी झडत आहे. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आमदार मुश्रीफ यांनी आणखी एकदा तोफ डागण्याची संधी साधली. 
 

संबंधित लेख