Has haribhau Bagde indirectly targetted Shivsena ? | Sarkarnama

हरिभाऊ बागडेंनी प्रशासनाचे निमित्त करून शिवसेनेला टार्गेट केले? 

जगदीश पानसरे 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

औरंगाबाद जिल्हा  परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसची  युती असून शिवसेनेच्या देवयानी डोणगावकरांकडे अध्यक्षपद आहे . 

औरंगाबादः  जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे  यांनी प्रशासनाला धारेवर धरतानाच सत्तारूढ शिवसेनेलाही अप्रत्यक्षपणे टार्गेट केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे . 

औरंगाबाद जिल्हा  परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसची  युती असून शिवसेनेच्या देवयानी डोणगावकरांकडे अध्यक्षपद आहे . 

जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे रौद्ररुप पुन्हा एकदा पहायला मिळाले. संधी मिळेल तेव्हा बागडे प्रशासनाची कानउघडणी करत असतात.

पण कालच्या बैठकीत बागडे यांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट बसवण्यावरून त्यांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराची लख्तरेच काढली. "बंधाऱ्यावर तुम्हाला गेट बसवता येत नसतील, तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही भीक मागून पैसे उभारू आणि गेट बसवू' अशा शब्दांत त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला धारेवर धरले. 

डीपीडीसीच्या बैठकीत तेच विषय आणि त्यावर अधिकाऱ्यांकडून ठरलेली जुनीच उत्तर ऐकून हरिभाऊ बागडे यांचा पारा चढला होता. त्यातच जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी साचलेले असतांना त्याला गेट बसवण्यात आलेले नाही हे समजल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच फटकारले. 

प्रशासकीय यंत्रणे संदर्भात बागडे यांनी व्यक्त केलेली नाराजी किंवा राग हा यापुर्वीच्या बैठकीतून देखील समोर आला आहे. "मुंगीला लाजवेल असा तुमच्या कामाचा वेग आहे' असे खडेबोल बागडे यांनी सुनावले होते. तर जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी भाड्याने  घेतल्या जाणाऱ्या पोकलेन, जेसीबीच्या वाढीव दरावरूनही त्यांनी अधिकाऱ्यांचा भांडाफोड केला होता. 

प्रशासनाच्या खांद्यावरून शिवसेनेवर नेम 

हरिभाऊ बागडे यांच्या टिकेचा सगळा रोख जिल्हा परिषदेवर होता. त्यामुळे बागडे यांनी प्रशासनाच्या खांद्यावरून शिवसेनेवर निशाना साधला असे दिसते.

शिवसेना आणि कॉंग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार कसा ढिसाळपणे सुरू आहे हे दाखवण्याची संधीच या निमित्ताने बागडे यांनी साधल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडे बोट दाखवत काम करून घेण्यात सत्ताधारी शिवसेना देखील कशी कमी पडते आहे हे अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे बोलले जाते.     

संबंधित लेख