काँग्रेस पक्ष शाकाहारी झाला आहे का ? गोव्याचे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांचा सवाल

फाॅर्मेलीन प्रकरणी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेस पक्ष शाकाहारी झाला आहे का, असा सवाल गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. मडगावच्या किरकोळ मासळी मार्केटात सफाई यंत्राचे अनावरण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Vijay Sardesai-Reginals Lowrence
Vijay Sardesai-Reginals Lowrence

मडगाव : फाॅर्मेलीन प्रकरणी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेस पक्ष शाकाहारी झाला आहे का, असा सवाल गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. मडगावच्या किरकोळ मासळी मार्केटात सफाई यंत्राचे अनावरण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

काँग्रेसचे गोवा प्रभारी डाॅ. चेल्लाकुमार यांनी मडगाव मार्केटला दिलेल्या भेटीत मासळीत फाॅर्मेलीन असल्याचा दावा करून जनतेत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काहीतरी विषय काढून गोवा संपल्याची हुल उठवायची हे काँग्रेसचे लक्ष्य आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला. 

नूतनीकरणानंतर मडगावचे किरकोळ मासळी मार्केटला आधुनिक रुप प्राप्त झाले आहे. पण, हे मार्केट आता चांगले आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटलेलेल मी एकदाही ऐकलेले नाही. विमानतळावर यांत्रीक पद्धतीने केली जाते तशी उत्कृष्ट सफाई या मार्केटात यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी, मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स यांनी आपले मत व्यक्त करावे, असे आावाहन त्यांनी केले. काँग्रेसचे नेते मासळी खरेदी करत नाहीत का व काँग्रेस पक्ष शाकाहारी झाला आहे का असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नांची उत्तरे काँग्रेस नेत्यांना द्यावी लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ''

किरकोळ मासळी मार्केटचा कायापालट झाला खरा पण आम्हाला फाॅर्मेलीनच्या आव्हानाचा सामना करावा लागला. फाॅर्मेलीनचा विषय गोव्यात सुरु झाला नव्हता. देशाच्या उत्तर किनारपट्टीत फाॅर्मेलीन प्रकरण सुरु आहे. गोव्यात हा वाद सुरु झाला. पण, आम्ही हा विषय योग्य पद्धतीने हाताळून यातून मार्ग काढला. या वादामुळे मासळी आयातीवर बंद घालण्याची व अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकारी इव्हा फर्नांडिस यांच्याकडे मडगाव घाऊक मासळी मार्केटात तपासणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात यावी अशी जनतेची मागणी होती. या दोन्ही मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यामुळे हा वाद आता संपल्यात जमा आहे," असे सरदेसाई यांनी सांगितले.

पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते असलेले सरदेसाई यांचे व गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या नेत्यांमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते असून सरदेसाई व काँग्रेस नेत्यांमध्ये सतत संघर्षाच्या ठिणग्या उडत असतात. विशेषतः गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व सरदेसाई यांच्यात खटकेबाजी सुरुच असते. 

मार्केट स्वच्छ, पण सहा महिन्यानंतर बघू -रेजिनाल्ड लाॅरेन्स

कायापालट करण्यात आलेले मडगावचे किरकोळ मासळी मार्केट स्वच्छ आहे यात शंका नाही, पण, फाॅर्मेलीन प्रकरणामुळे सध्या या मार्केटात लोक कमी प्रमाणात येतात. पूर्वीप्रमाणे लोकांची गर्दी झाली व तेव्हा मार्केट स्वच्छ आढळले तर सरदेसाई यांचे कौतुक करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स यांनी व्यक्त केली. या मार्केटला नवीन झळाळी मिळाली असली तरी मार्केटचे बांधकाम  काम सर्वोत्कृष्ट पद्धतीने झालेले नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

फाॅर्मेलीनचा विषय संपला असल्याचे सरदेसाई सांगत असले तरी या बद्दल जनतेच्या मनातील भीती अजून गेलेली नाही. त्यांनी काहीही केले तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. भाजप, गोवा फाॅरवर्ड, मगो व अपक्ष आमदारांची युती असलेल्या या सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे आणि जनतेचा विश्वास नसलेल्या सरकारमध्ये सरदेसाई आहेत, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com