harshwardhan Patil snubs MLA Bharne | Sarkarnama

आमदार भरणे यांची कारकिर्द विझण्याच्या मार्गावर : हर्षवर्धन पाटील यांचा टोला 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जून 2017

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार यांच्यातील शाब्दिक लढाई पुन्हा सुरू झाली आहे. इंदापूरच्या पाणी प्रश्नावरून भरणे यांनी पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला हर्षवर्धन यांनी विझणारा दिवा म्हणून प्रत्युत्तर दिले.

भवानीनगर : "आमदारकीच्या गेल्या साडेतीन वर्षाच्या  कार्यकाळात कोण वैफल्यग्रस्त झाले याची संपूर्ण इंदापूर तालुक्‍याला आणि राज्यालाही माहिती झाली आहे. दिवा विझताना मोठा होऊन विझतो. त्याप्रमाणे दत्तात्रय भरणे यांची कारकिर्द आता विझण्याच्या मार्गावर आहेत. ते फक्त मोठी बडबड करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणाच्या टिकेचा मी विचार करणार नाही,'' अशा शब्दांत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
 
भरणे यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पाटील यांच्यावर टीका केली होती. हर्षवर्धन यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप त्यांनी केला होता. आज सणसर येथे पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या पाटील यांनी भरणे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, ""एकाच पावसाळ्यात दोन वेळा धरणे भरली असताना इंदापूर तालुक्‍याला हक्काचे पाणी मिळाले नाही. याची जबाबदारी कोणाची? पाणी आणायची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. इतर तालुके हिरवेगार असताना इंदापूर तालुक्‍याच्या निम्म्या भागातील सात हजार एकर पिके जळून गेली आहेत. विशेष म्हणजे भाटघर धरणाचे पाणी संपल्यानंतर शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आंदोलन करतातय लोकांची ही चेष्टा नाही का?'' 

"तालुक्‍यातील काही भागाला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्याचे भरणे यांचे धोरण आहे. सणसर-लासुर्णे जिल्हा परीषदेच्या संपूर्ण गटात त्यांनी पाणी पोचू दिले नाही. निमगाव केतकी व कळंब जिल्हा परीषद गटाच्या काही भागात पाणी पोचू दिले नाही. याला राजकारण म्हणतात काय? आम्ही वीस वर्षे सत्तेवर होतो. मात्र कधीही मंत्रीपदाचा गैरवापर केला नाही, आमच्याही वेळी विरोधक होते, मात्र म्हणून आम्ही द्वेषाचे राजकारण केले नाही. सरसकट आम्ही पाणी दिले. आज तालुक्‍यात सणसर कटचा कायदेशीर 1.2 टीएमसी पाण्याचा करार असतानाही गेल्या तीन वर्षात पाण्याचा थेंब मिळालेला नाही. उजनीचे पाणी खाली सोडून दिले, मात्र मदनवाडी ते तरंगवाडी पर्यंतचे तलाव काही भरून घेता आले नाहीत. नीरा नदीतील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवले नाही. या साऱ्या गोष्टींवर बोलले तर त्याला राजकारण कसे म्हणायचे? पाणी महत्वाचे नाही का,'' असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. 

"आम्ही कधीही शिवराळ भाषा वापरली नाही. निवडणुकीत हार-जीत असते. आमचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र पंचायत समिती, कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालेला भरणे विसरतात. या तालुक्‍याला आंदोलन केल्याशिवाय पाणी मिळत नाही, अशी स्थिती पहिल्यांदा निर्माण झाली आहे. गावागावात भांडणे लावण्याचे उद्योग सत्ताधाऱ्यांनी केलेले आहेत. त्यामुळे आता आपले कर्तृत्वाचे खापर इतरांवर फोडणयाचे काहीच कारण नाही,''असा सल्ला त्यांनी दिला. 
 

संबंधित लेख