Harshwardhan Patil is master in the art of political splits | Sarkarnama

फोडाफोडीत हर्षवर्धन पाटील माझे गुरू : पालकमंत्री गिरीश बापट 

सरकारनामा
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

मध्यंतरी इंदापूरच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटना वेळी त्यांनी पाटील यांचे नाव नसल्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. आता त्यांचे तोंडभरून कौतुक केल्याने भाजपला नेमके काय साधायचे आहे, अशी चर्चा इंदापूर तालुक्‍यात सुरू झाली.

बारामती :  "संसदीय मंत्र्याकडे एक अदृश्‍य खाते असते, फोडाफोडीचे... आणि ती कशी करायची हे मीदेखील हर्षवर्धन पाटील यांच्याकडूनच शिकलो,'' असा गौप्यस्फोट पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला. तसेच अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या हुशारीची आम्हाला गरज असल्याचे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

निमित्त होते, सांगवी (ता. बारामती) येथे सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्या सत्कार समारंभाचे. या कार्यक्रमात बापट यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्याअगोदर हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले.

तो धागा पकडत बापट म्हणाले, " हर्षवर्धनजी तुम्ही पालकमंत्र्याच्या उपस्थितीत मनमोकळे बोललात. तसे आधी बोलायचा नाही. बहुधा तुम्हाला आधीच्या पालकमंत्र्यांचे टेन्शन असावे.'' बापट यांच्या या विधानावर चांगलाच हशा पिकला. 

 " खरेतर हर्षवर्धन पाटील हे सन 1995 पासून माझे चांगले मित्र आहेत. मनोहर जोशींच्या काळात त्यांनी सरकारने चांगले निर्णय घ्यावेत असा आग्रह सातत्याने धरला. त्यांच्या अनुभवाचा फायदा संसदीय कामकाज मंत्री बनल्यानंतर मला झाला. आता गुरूची विद्या मी गुरूला देणार आहे,'' असे बापट म्हणाले. 

भाजपला काय साधायचेय? 
प्रसंगी पुण्याचा रोष पत्करून इंदापूरला पाणी देण्याचे काम गिरीश बापट यांनी केल्याने ते आमदार दत्तात्रेय भरणेंवर खूष आहेत असा संदेश आजवर गेला. मात्र, मध्यंतरी इंदापूरच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटना वेळी त्यांनी पाटील यांचे नाव नसल्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. आता त्यांचे तोंडभरून कौतुक केल्याने भाजपला नेमके काय साधायचे आहे, अशी चर्चा इंदापूर तालुक्‍यात सुरू झाली. 

संबंधित लेख