harshwardhan patil has right over indapur but.... | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

इंदापूरच्या जागेवर हर्षवर्धन पाटील यांचा हक्क.....पण?

डाॅ. संदेश शहा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

काॅंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेने आज पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. इंदापूरच्या जागेवर सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आमदार असल्याने दोन्ही काॅंग्रेसच्या आघाडीत ही जागा पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना मिळेल...पण, असा थोडा सबुरीचा सूर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लावला.

इंदापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देश व राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या फसव्या सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेस इंदापूरात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उत्सूर्त घोषणा केली. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थोडा सबुरीचा सूर लावला.

इंदापूर विधानसभेची उमेदवारी ही काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांचा हक्क असून यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करू, असे सूतोवाच त्यांनी केले. 
यावेळी `हर्षवर्धन पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,` या घोषणांत अशोक चव्हाण हे देखील 
उत्स्फूर्त सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान मोदी, मुख्य- मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी, सहकारी धोरणावर कडक टीका करण्यात आली. 

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, `अच्छे दिन`चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्यांनी चार वर्षे फसवे राजकारण केले. शेती, सहकार, साखर कारखानदारी संपविण्याचा प्रयत्न केला. खोटे बोल पण रेटून बोल, ही त्यांची संस्कृती असून ते मस्तवाल झाले आहेत. सन २०१४ ला त्यांची `बेटी बचाव` ही घोषणा होती. मात्र आता `बेटी भगाव` हे त्यांचे तत्त्व झाले आहे.`` 

सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता ही त्यांचे सूत्र झाले अाहे. सैनिकांच्या कुटुंबांबद्दल अपशब्द काढणे, महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत त्यांच्यातील काही जणांची मजल गेली आहे. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र जनतेत मात्र दारिद्रय, अशी बिकट स्थिती सर्वसामान्यांची झाली आहे.इंदापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे निवडून आणण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करा,`` असे आवाहन त्यांनी केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राफेल विमान खरेदी १२६ विमानांची ६२३ कोटी रूपयाने करण्याचे काँग्रेस राजवटीत ठरले. मात्र त्यानंतर काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर सत्तेतील भाजपा सरकारने केवळ ३६ विमानांची खरेदी १६६० हजार कोटींना ठरली. यामध्ये ४० हजार कोटी रूपयांचा भष्ट्राचार झाला असून हा भष्ट्राचार जगात सर्वाधिक रूपयांचा झाला आहे. शेतक-यांना दीडपट हमीभाव नाही, युवकांना 
रोजगार नाही. त्यामुळे या दिशाभूल करणा-या सरकारला त्याची जागा दाखवा.``

यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रामहरी रूपनवर व जयकुमार गोरे, दिपक जाधव आदींची भाषणे झाली. 

संबंधित लेख