Harshwardhan Patil to display his clout in Jansangharsh yatra | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील करणार काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत शक्तीप्रदर्शन 

राजकुमार थोरात
रविवार, 2 सप्टेंबर 2018

एकता दौडच्या गर्दीने चुकविला विरोधकांचा काळजाचा ठोका..
गेल्या आठवड्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य  साधुन तालुक्यामध्ये एकता दौड आयोजित केली होती.सकाळी आठ वाजता कार्यक्रम असताना देखील दौडमध्ये तालुक्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.गर्दीचा उच्चांक झाला असल्याने विराेधकांच्या काळजचा ठोका चुकला होता. जनसंघर्ष यात्रेला किती गर्दी होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

वालचंदनगर :  विधानसभा निवडणूकीला वर्षाचा अवधी असला तरीही तालुक्यामध्ये आमदारकीच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. तालुक्यातील आमदारकीची निवडणूक चुरशीची होणार असुन तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसला चपराक देण्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील बुधवार (ता.5) रोजी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातुन तालुक्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

2009 च्या विधानसभा निवडणूकीपासुन तालुक्यामध्ये आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. 2009 ला पाटील यांनी भरणेंचा पराभव केला. व 2014 मध्ये भरणे यांनी पाटलांचा पराभव करुन फिटाफिट केली. 2019 मध्ये कोणाचा विजय होणार हे येणारी वेळच सांगणार आहे.

कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची राज्यामध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र तालुक्यामध्ये सध्या दोन्ही पक्षामध्ये सध्या बिघाडी आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. आमदार भरणे यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

 यानंतर पक्षाच्या अंतर्गत घडामोडींना वेग आला. झेडपची सभापती प्रवीण माने यांनी वाढदिवसाचे निमित्त  साधून शक्तीप्रदर्शन केले .  सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी नागपंचमी सणाचे निमित्त करीत   खासदार सुप्रिया यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमात आपले बळ दाखवून दिले . राष्ट्रवादीमध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी भरणे,जगदाळे व माने यांच्यामध्ये स्पर्धा अाहे.

 कॉग्रेसमध्ये तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे एकमेव उमेदवारीचे दावेदार आहेत.राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा तालुक्यामध्ये आली नव्हती.मात्र कॉग्रेसच जनसंघर्ष यात्रा तालुक्यामध्ये 5 सप्टेंबर रोजी सकाळीच येणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी यात्रेच्या माध्यमातुन तालुक्यामध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत . 

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कंबर कसली आहे .   तयारी जोरदार सुरु आहे. पाच हजार दुचाकी, एक ते दोन हजार चारचाकी गाड्यांची भव्य रॅली काढण्यात येणार असुन जाहीर सभा हाेणार आहे. सभेला जास्तीजास्ती नागरिकांनी उपस्थित राहावे  यासाठी पदाधिकारी नियोजन करीत आहेत.

येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते.पाटील यांच्याविरोधात भरणे,जगदाळे,माने तिघेही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी वाढत चालली असुन पाटील यांच्या विरोधात कोण निवडणूक लढविणार याकडे तालुक्यातील जनतेबरोबर जिल्हात ही उत्सुकता लागली आहे.

 

संबंधित लेख