Harshwardhan Jadhav to take Meeting for Maratha Party | Sarkarnama

स्वतंत्र मराठा राजकीय पक्षासाठी हर्षवर्धन जाधव घेणार चिंतन बैठक 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून आधी शांततेत आणि नंतर ठोक मोर्चा काढत मराठा क्रांती मोर्चाने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून थेट आमदारकीचा राजीनामा देत या आंदोलनात उडी घेतली होती. तसेच आरक्षणासाठी मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याचा विचार देखील बोलून दाखवला होता. 

औरंगाबाद : मराठा समाजासह मुस्लिम, धनगर आरक्षण व सामाजिक समतेसाठी स्वंतत्र राजकीय पक्षाची निर्मीती करण्याची संकल्पना कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडली होती. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या (ता.18) औरंगाबादेत मराठा समाजासह अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चिंतन बैठक घेण्यात येणार आहे. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून आधी शांततेत आणि नंतर ठोक मोर्चा काढत मराठा क्रांती मोर्चाने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून थेट आमदारकीचा राजीनामा देत या आंदोलनात उडी घेतली होती. तसेच आरक्षणासाठी मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याचा विचार देखील बोलून दाखवला होता. 

यावर समाजातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी हर्षवर्धन जाधव मराठा आरक्षणाचा विषय राजकारणासाठी वापरत असल्याचा आरोप देखील केला. या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापनेसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. 

मात्र मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारवर आपला विश्‍वास राहिला नाही, त्यामुळे नवा राजकीय पक्ष स्थापन करावा का? याची चाचपणी उद्याच्या चिंतन बैठकीतून हर्षवर्धन जाधव घेणार आहेत. दुपारी 2 ते 6 या वेळेत तापडीया नाट्य मंदिरात ही चिंतन बैठक होणार आहे. मराठा समाजासह अठरा पगड जातीच्या लोकांनी या बैठकीत सहभागी होऊन स्वतंत्र राजकीय पक्षाबद्दलची मते मांडावीत असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. 

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी या मोर्चाचा वापर कुणीही वैयक्तिक, पक्ष, संघटना बांधणीसाठी करू नये असा निर्वाणीचा इशारा रविवारी (ता.16) पत्रकार परिषद घेऊन दिला होता. या पार्श्‍वभूमीवर उद्या हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापनेसाठीच्या चिंतन बैठकीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख