harshwardhan jadhav mla to mp | Sarkarnama

आमदारपदाचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांचे लक्ष्य खासदारपद ?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

औरंगाबाद : आधी शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न आणि आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव सध्या जिल्हाच नाही तर राज्यभरात चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षभरातील त्यांची राजकीय वाटचाल आणि हाती घेतलेले विषय यावर बारकाईने लक्ष दिले तर हर्षवर्धन जाधव यांना खासदार व्हायचंय का? असा प्रश्‍न पडतो. त्यांचे वडील दिवंगत आमदार रायभान जाधव यांची पुण्याई, मतदासंघात केलेली विकासकामे या जोरावर हर्षवर्धन जाधव राजकारणात यशस्वी झाले.

औरंगाबाद : आधी शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न आणि आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव सध्या जिल्हाच नाही तर राज्यभरात चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षभरातील त्यांची राजकीय वाटचाल आणि हाती घेतलेले विषय यावर बारकाईने लक्ष दिले तर हर्षवर्धन जाधव यांना खासदार व्हायचंय का? असा प्रश्‍न पडतो. त्यांचे वडील दिवंगत आमदार रायभान जाधव यांची पुण्याई, मतदासंघात केलेली विकासकामे या जोरावर हर्षवर्धन जाधव राजकारणात यशस्वी झाले. मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठ्याच्या रखडलेल्या योजनांचा जाब थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांना जाऊन विचारणे, बंद खोलीतली चर्चा प्रसार माध्यमांसमोर उघड करणे यामुळे सगळेच त्यांना बिचकून असतात. 

कचऱ्यातून जिल्ह्याच्या राजकारणात भरारी 
कन्नड तालुक्‍यातील जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीच्यावेळी हर्षवर्धन जाधव यांचे जिल्ह्यातील नेतृत्वाशी खटके उडाले. जिल्हा परिषद सर्कलमधून पत्नी संजना जाधव यांचा पराभव झाला आणि तिथूनच हर्षवर्धन जाधव यांनी जिल्ह्याच्या नेतृत्वाविरोधात रणशिंग फुंकल्याचे स्पष्ट झाले होते. मतदारसंघ सुरक्षित करतांनाच त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात कशी एन्ट्री करता येईल याचाही विचार सुरू केला होता. कचरा प्रश्‍नाने हर्षवर्धन जाधव यांच्यापुढे आयती संधी चालून आली. कचरा प्रश्‍नामुळे सर्वसामान्यांच्या मनात महापालिका व जिल्ह्यातील नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी असल्याचे जाधव यांनी हेरले आणि कचरा प्रश्‍नात उडी घेतली. 
जिल्ह्यात कुठेही कचरा टाकू दिला जात नसतांना माझ्या मतदारसंघात कचरा आणून टाका अशी भूमिका मांडत या प्रश्‍नाला त्यांनी हात घातला. त्यानंतर महापालिकेने काही तासांतच 31 ट्रक कचरा पिशोरजवळ नेऊन टाकला. पण याचे राजकीय परिणाम काय होतील याची जाणीव होताच सुत्र हलली आणि कन्नडला जाणारा कचरा थांबला. 

पण तोपर्यंत औरंगाबादकरांची सहानुभूती मिळवण्यात हर्षवर्धन जाधव बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. दुसरीकडे कन्नड मतदारसंघात कचरा आणल्यामुळे सोशल मिडिया आणि विरोधकांकडून सुरू झालेला हल्ला परतवून पॅचअप करण्यात हर्षवर्धन जाधव यांना यश आले. 
मराठा आरक्षण आंदोलनाने दुसरी संधी 
कचरा प्रश्‍नावरची चर्चा संपत नाही तोच राज्यात मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या टप्याचे आंदोलन सुरू झाले. औरंगाबादेत या आंदोलनाला अधिकच धार आली. कायगांव टोका येथील जलसमाधी आंदोलनात गंगापूर तालुक्‍यातील काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला आणि त्याचे हिंसक पडसाद राज्यभरात उमटले. अशा परिस्थीतीतही हर्षवर्धन जाधव यांनी आणखी एक खेळी यशस्वी केली. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा नाही तर राजीनामा देतो असा इशारा देत त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. 
मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला तर त्याचे राजकीय आणि सामाजिक फायदे ओळखून हर्षवर्धन जाधव यांनी दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा मेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे पाठवून दिला. एवढ्यावरच न थांबता विधानभवन गाठून राजीनामा सोपवत आपला हेतू शुध्द असल्याचे पटवून दिले. राजीनामास्त्र कमालीचे यशस्वी ठरले. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा राज्यातला पहिला आमदार होण्याचा मान हर्षवर्धन जाधव यांना मिळाला. राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन गुंडाळून त्यांनी क्रांतीचौकातील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्यामध्ये सहभाग नोंदवला. तिथे जोरदार भाषण ठोकत "तरूणांनी आत्महत्या करू नये, मागणीवर ठाम राहावे, कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगत मराठा तरूणांची मन जिंकण्याचाही प्रयत्न केला. 

हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झाले खरे पण हिरो ठरले जाधवच. शनिवारी (ता.28) शहरातील पुंडलीकनगर भागात काही मराठा आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले. यात आंदोलना दरम्यान मराठा तरूणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची देखील मागणी होती. या तरूणांची समजूत काढून त्यांना सुखरूप खाली उतरवण्यातही हर्षवर्धन जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केल्याचे सांगत हर्षवर्धन जाधव यांनी टाकीवरील आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही झाली. त्यानंतर मराठा आंदोलनातील तरूणांनी हर्षवर्धन जाधव यांना खाद्यांवर घेत जल्लोष केला. 

हर्षवर्धन जाधव यांनी कचरा आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मागे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार हर्षवर्धन जाधव यांच्या मनात असल्याचेही बोलले जाते. 

संबंधित लेख