शिवसेना - भाजप युतीचा हर्षवर्धन जाधवांनी घेतला धसका, खैरेंवर केला हल्लबोल 

हिंदूत्वाच्या नावाखाली राजकारण करून एकदा नव्हे तर चारवेळा खैरेंनी खासदारकी उपभोगली, मात्र विकासाच्या नावाने बोंब आहे.- हर्षवर्धन जाधव
Harshwardhan-Imtiaz
Harshwardhan-Imtiaz

औरंगाबादः आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार नाही, त्यामुळे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणे सोपे जाईल असा अंदाज विरोधकांकडून बांधला जात होता. शिवसेना-भाजपचे कमालीचे ताणले गेलेले संबंध आणि टोकाची टिका पाहता युती अशक्‍य असेच वाटत होते. पण अखेर युती झालीच. परिणामी अनेकांची राजकीय गणित बिघडली आहेत.

आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड पुकारत खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरुध्द लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचे देखील असेच काहीसे झाले आहे. युतीचा धसका घेतल्याने युती होताच हर्षवर्धन जाधव हे खैरे यांच्या विरोधात अधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. 

शिवराज्य बहुजन पक्षाची स्थापना करत शिवसेनेच्या विरोधात लोकसभा लढवण्याची घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नी संजना जाधव यांच्या पराभवाला खैरे आणि त्यांचे समर्थकच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत जाधव यांनी खैरेंच्या विरोधात आघाडी उघडली होती. 

त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र आघाडीमार्फत निवडणूका लढवत जाधव यांनी आधीच बंडाचे निशाण फडकवले होते. लोकसभा लढवण्याची घोषणा आणि स्वःताचा पक्ष काढून जाधवांनी एका अर्थाने शिवसेनेला जय महाराष्ट्रच केला आहे. 

सलग चारवेळा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून  येण्याचा विक्रम असणारे खासदार चंद्रकांत खैरे यांना सातत्याने मताधिक्‍य मिळवून देणाऱ्या कन्नडमधूनच पराभूत करण्याची तयारी जाधव यांनी सुरू केल्याचे बोलले जाते. गेल्या सहा महिन्यांपासून हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा मतदारसंघांचा दौरा आणि भेटीगाठीवर भर दिला आहे.

शिवाय शहरी भागातील कचरा, पाणी व अन्य प्रश्‍नांमध्ये हस्तक्षेप करत त्यांनी आपण लोकसभा लढवण्याचे मनावर घेतले असल्याचेही दाखवून दिले. शहरातील ज्या मंदिरांच्या उभारणीसाठी खासदार खैरे यांनी आपला निधी दिला, त्याच मंदिरांना भेटी देत मदत करण्याचे धोरण स्वीकारत जाधव यांनी धूर्त खेळी केली. 

युती झाल्याचा धसका? 

युतीचे वाजणार आणि खैरेंना भाजप, वंचित बहुजन आघाडी, कॉंग्रेस, हर्षवर्धन जाधव अशा चार विरोधकांशी दोन हात करावे लागणार असे चित्र कालपर्यंत होते. त्यामुळे 2019 मध्ये खैरेंना पराभूत करणे अशक्‍य नाही असा आत्मविश्‍वास खैरे विरोधक बाळगून होते. परंतु मुंबईत युतीवर शिक्कामोर्तब झाले आणि विरोधकांचा आत्मविश्‍वास काहीसा डगमगल्याचे चित्र आहे. 

सर्वजाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन वाटचाल करणारा आणि जातीयवादाला थारा न देणारा आपला पक्ष असल्याचे हर्षवर्धन जाधव ठणकावूण सांगतात. हे पटवून देण्यासाठीच त्यांनी मंगळवारी जल्लोषात साजरी करण्यात आलेल्या शिवजंयती मिरवणूकीत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह अठरापगड जमातीला सहभागी करून घेतले होते. यावेळी व्यासपीठावरून भाषण करतांना हर्षवर्धन जाधव यांनी खासदार खैरे यांच्यावर जोरदार टिकाही केली. 

हिंदूत्वाच्या नावाखाली राजकारण करून एकदा नव्हे तर चारवेळा खैरेंनी खासदारकी उपभोगली, मात्र विकासाच्या नावाने बोंब आहे. आता निवडणुकीच्या तोडांवर पुन्हा तोच जातीपातीचा मुद्दा पुढे केला जाईल, पण जनतेच्या कानात बिड्या नाहीत, मतदार हुशार झाले आहेत अशी तोफ जाधव यांनी डागली. युतीचा निर्णय झाल्यानंतर अधिकच आक्रमक झालेले हर्षवर्धन जाधव प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या मैदानात खैरेंना कशी लढत देतात हे पाहणे नजीकच्या काळात महत्वाचे ठरणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com