कचऱ्यातून खत तयार करून हर्षवर्धन जाधवांनी केले विरोधकांचे तोंड बंद

कचऱ्यातून खत तयार करून हर्षवर्धन जाधवांनी केले विरोधकांचे तोंड बंद

औरंगाबाद : तुम्ही तालुक्‍याचा कचरा करायला निघाले का ? असे कुठे खत तयार होत असते का ? रोगराई होईल, कचऱ्यामुळे लोक आजारी पडतील असा प्रश्‍नांचा भडीमार करत कन्नडमध्ये कचरा आणण्यास विरोध करणाऱ्या विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. कन्नड मतदारसंघातील पिशोर येथील हिराजी साखर कारखाना परिसरात औरंगाबाद शहरातील शंभर टन कचरा आणून टाकण्यात आला होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कचराकोंडीतून औरंगाबादकरांची सुटका करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी शहरातील कचरा माझ्या तालुक्‍यात आणून टाका असा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. 

त्यानुसार महापालिकेने 25 ट्रकमधून शंभर टन कचरा पिशोर येथे नेऊन टाकला. परंतु त्यांनतर घडलेल्या राजकीय घडामोडीतून हर्षवर्धन जाधव यांच्यावर मतदारसंघातून टीकेची झोड उठली होती. तालुक्‍याचा विकास करता येत नसेल तर किमान कचरा तरी करू नका अशा शब्दांत विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र शंभर टन कचऱ्यातून खत निर्माण करून दाखवत हर्षवर्धन जाधव यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आज कचऱ्यातून तयार करण्यात आलेल्या खताचे पिशोर येथे शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी विरोधकांना सुनावण्याची संधी जाधव यांनी सोडली नाही. 

तुम्ही येता की खत घरी पाठवू 
ज्यावेळी कचरा पिशोरमध्ये आणला त्यावेळी विरोधकांनी माझ्यावर टीकेचा भडीमार केला. मी तालुक्‍याचा कचरा करायला निघालो असा आरोपही माझ्यावर केला गेला. लोक आजारी पडतील, रोगराई पसरले अशी आवई उठवून मी कसा चुकीचा निर्णय घेतला हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. पण प्रत्यक्षात रोगराई पसरून कुणीही आजारी पडले नाही. उलट खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला. आता माझे विरोधकांना आव्हान आहे, त्यांनी आधी इथे येऊन कचऱ्यापासून तयार केलेले खत पाहून जावे. तुम्ही आला नाहीत तर तुमच्या घरी खत पाठवण्याची व्यवस्था करतो असा जोरदार टोला देखील हर्षवर्धन जाधव यांनी कचरा प्रश्‍नावरून टिका करणाऱ्या विरोधकांना लावला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com