harshwardhan jadhav | Sarkarnama

माझी नाराजी दूर, मी शिवसेने सोबतच - हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कन्नड तालुक्‍यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मला कुठलेच अधिकार देण्यात आले नव्हते या तक्रारीवर यापुढे आपण व्यवस्थित लक्ष ठेवू असे आश्‍वासन उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. मुळात मी शिवसेनेवर नाराज नव्हतोच, पण मला माझे गाऱ्हाणे मांडण्याची संधी दिली जात नव्हती असेही जाधव म्हणाले. 

औरंगाबाद : "पक्षात माझ गाऱ्हाण कोणी ऐकूनच घेत नव्हतं, त्यामुळे मी नाराज होतो. शिवसेना नेते सचिव अनिल देसाई यांनी मला फोन करुन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घालून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे आज (ता. 27) माझी उध्दव ठाकरे यांच्याशी भेट होऊन चर्चा झाली. त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली. तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच पक्षासोबत राहून काम करण्याचे आदेश देखील दिले आहेत. आता माझी नाराजी दूर झाली असून मी शिवसेनेसोबतच असल्याचे कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामा शी बोलतांना स्पष्ट केले. 
मराठवाड्यातील शिवसेना आमदारांची बैठक आज मातोश्रीवर पार पडली. या बैठकीला नाराज असलेले हर्षवर्धन जाधव यांना देखील दोन दिवसांपुर्वीच शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी फोन करून येण्यास सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मला अधिकार देण्यात आले नाही या तक्रारीसह शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दलही त्यांचा आक्षेप होता. पक्ष दखल घेत नसल्याने जाधव यांनी अलीकडच्या काळात कॉंग्रेसशी जवळीक साधत पक्षाला इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हर्षवर्धन जाधव यांनी आपले गाऱ्हाणे सविस्तर मांडले. 

संबंधित लेख