Harshwardhan and Bharne tug of war | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

इंदापुरात सरपंचांचा "दुहेरी डावाने' पाटील-भरणे वाद मिटेना! 

राजकुमार थोरात
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांकडून सत्कार स्वीकारणाऱ्या सरपंच व सदस्याची पंचायत झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध थांबवण्याचे नावच घेत नसून यामुळे जनतेची करमणूक होऊ लागली आहे. 

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांकडून सत्कार स्वीकारणाऱ्या सरपंच व सदस्याची पंचायत झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध थांबवण्याचे नावच घेत नसून यामुळे जनतेची करमणूक होऊ लागली आहे. 

इंदापूर तालुक्‍यामध्ये 26 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता.यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाला. तर 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचे निकाल मंगळवार (ता.17) रोजी जाहीर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षामध्ये निवडणुकीच्या निकालावरून चढाओढ सुरू झाली. दोन्ही पक्षाने प्रत्येकी 17 ग्रामपंचायतीवर वर्चस्व असल्याचा दावा केला. 

आमदार भरणे यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार करून बाजी मारली. हर्षवर्धन पाटील यांनीही रविवार (ता.22) रोजी विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार करून 17 ग्रामपंचायतीवर वर्चस्वाचे दावा केला. यानंतर कुरवली ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी आम्ही राष्ट्रवादीचे असल्याचा निर्वाळा दिल्याने कॉंग्रेस पक्षाने कुरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यावर पाटील यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. रेडणीच्या सरपंचांनी सुरवातीला मी जनतेचा आहे असे सांगितले होते.मात्र नंतरच्या काळामध्ये आमदार भरणे व हर्षवर्धन पाटील या दोघांनाही मी तुमचाच असल्याचे सांगितल्याने रेडणीचे सरपंच नक्की कोणाचे, असा पेच निर्माण झाला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील यांनी बिनविरोध झालेल्या गंगावळण व झगडेवाडीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे सांगताच कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव यांनी गंगावळण व झगडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी कॉंग्रेसचे मदत घेण्याची गरज का भासली, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस महारुद्र पाटील व कॉंग्रेस ऍड.कृष्णाजी यादव सारख्याच पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकी 17 ग्रामपंचायतीवर दावा असल्याचे ठासून सांगत आहेत. दोन्ही पक्षामध्ये सुरू झालेले वाकयुद्द थांबण्याचे नावच घेईना अशी परिस्थिती झाली आहे.दोन्ही पक्षाच्या दाव्यामुळे हर्षवर्धन पाटील व आमदार भरणे यांच्याकडून सत्कार स्वीकारणाऱ्या व दोघांनाही आम्ही तुमचेच आहोत असे सांगणाऱ्या सरपंच व सदस्यांची पंचायत झाली आहे.मात्र दोन्ही पक्षाच्या टीका व दाव्यामुळे जनतेची करमणूक होऊ लागली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस दावे करत असलेल्या एकसमान ग्रामपंचायती 
गंगावळण, झगडेवाडी, रेडणी, कुरवली, डाळज नंबर - 2 

संबंधित लेख