harshwardahan warns ncp about indapur | Sarkarnama

हर्षवर्धन यांचा राष्ट्रवादीला इंदापूरबाबत सूचक इशारा : सुळे यांची लोकसभा निवडणूक विधानसभेच्या आधी

राजकुमार थोरात
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होण्याआधीच दोन्ही पक्षांत काही जागांवरून खटके उडू लागले आहेत. त्यात इंदापूरचा विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत आला आहे. माजी सहकारमंत्री व येथून काॅंग्रेसचे संभाव्य उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी या मतदारसंघात काॅंग्रेसचा दावा कसा योग्य आहे, यावर जोरदार बॅंटिंग केली.

पुणे : ``विधानसभा निवडणूक होण्याआधी लोकसभा निवडणूक आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसला हे लक्षात ठेवून इंदापूरची जागा ही काॅंग्रेसला सोडावीच लागेल,` असा विश्वास माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. काॅंग्रेसने सहकार्य न केल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बारामती मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे या निवडणुकीत धोक्यात येऊ शकतात,`` असा सूचक इशारा त्यांनी दिला.

`सरकारनामा` फेसबुक लाइव्हवर पाटील यांनी विविध राजकीय प्रश्नांना उत्तर दिली. या चर्चेत साहजिकच इंदापूरच्या जागेचा विषय निघाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर इंदापूरची जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही तरी दोन्ही पक्षाची आघाडी होणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावर काॅंग्रेसच्या नेत्यांनी ही जागा आमचीच असल्याचे इंदापुरात पुन्हा स्पष्ट केले होते. या साऱ्या मुद्यांवर हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

ते म्हणाले, ``१९५२ पासून हा मतदारसंघ काॅंग्रेसकडे आहे. मी १९९५ मध्ये अपक्ष आणि नंतर काॅंग्रेसकडून याच मतदारसंघात लढून आलो. आता २०१४ मध्ये दोन्ही काॅंग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले. तेव्हा माझ्याविरोधात निकाल गेला म्हणून तो मतदारसंघ राष्ट्रवादीचा होत नाही. माजी खासदार (स्व.) शंकरराव पाटील यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करावा लागेल.``

 

अजित पवार तर इंदापूरबाबत ठाम आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले,``या जागेचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. अजित पवार यांचे इंदापूरच्या जागेबाबतचे वक्तव्य हे आमदार भरणे यांनी बोलविलेल्या मेळाव्यात केलेले होते. कार्यकर्त्यांसमोर बोलताना असा दावा करावा लागतो. भरणेंच्या मेळाव्यात बोलताना ही जागा हर्षवर्धन पाटलांसाठी सोडावी लागेल, असे कसे ते म्हणातील?

सुप्रिया सुळे यांना लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत इंदापुरातून २७ हजार मतांची आघाडी होती. ही आघाडी कोणत्या गावांतून मिळाली आहे, तेथे कोणी काम केले आहे, हे सर्वांना माहिती आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गावात सुळे या पिछाडीवर होत्या. काॅंग्रेसने त्यांचे काम प्रामाणिकपणे केले आहे. भोरमध्ये संग्राम थोपटे किंवा पुरंदरमध्ये संजय जगताप यांनीही सुप्रियांसाठी चांगले काम केले. लोकसभेला राष्ट्रवादीला आमची मदत आवश्यक असते. त्यामुळे थोपटे यांनी लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप एकाच वेळी करा, अशी मागणी केली आहे, याकडेही हर्षवर्धन यांनी लक्ष वेधले.

दोन्ही पक्षांत जागांची अदलबादल होण्याची प्रक्रिया सुरू असते. विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लातूरची काॅंग्रेसची जागा राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीची परभरणीची जागा काॅंग्रेसला दिली होती. गोंदिया मतदारसंघात भाजपचे खासदार नाना पटोले हे राजीनामा देवून काॅंग्रेसमध्ये आले होते. त्या जागेवर काॅंग्रेसचा अधिकार होता. मात्र काॅंग्रेसने ती जागा राष्ट्रवादीला सोडली. तेथे आता राष्ट्रवादीचा खासदार आहे, याचीही आठवण त्यांनी या चर्चेत करून दिली.  

संबंधित लेख