Haribhau Bagde Clamis that Congress Removed Maratha Reservation Given by British Rulers | Sarkarnama

मराठ्यांना इंग्रज काळापासून आरक्षण, पण काँग्रेसनं काढून घेतलं - हरिभाऊ बागडे 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 9 डिसेंबर 2018

मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच भाजप-सेना युती सरकारने घेतला. त्याचा कायदा करत अमंलबजावणी देखील सुरू केली. आता मराठा आरक्षण दिल्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा भाजपमध्ये लागल्याचे पहायला मिळते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता नेते आपापल्या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण विद्यमान सरकारमुळेच मिळाल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. 

औरंगाबाद : मराठा समाजाला इंग्रजांच्या काळापासून आरक्षण होतं, पण काँग्रेसने ते काढून मराठ्यांना कुणबी ठरवलं, असा आरोप करतांनाच आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याच वचन दिलं होतं आणि ते पाळलं, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा शब्द आपण खरा करून दाखवल्याचा पुनरूच्चार केला. 

मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच भाजप-सेना युती सरकारने घेतला. त्याचा कायदा करत अमंलबजावणी देखील सुरू केली. आता मराठा आरक्षण दिल्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा भाजपमध्ये लागल्याचे पहायला मिळते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता नेते आपापल्या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण विद्यमान सरकारमुळेच मिळाल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. 

फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे देखील यात आघाडीवर आहेत. औरंगाबाद जवळील राष्ट्रीय महामार्ग व आडगाव बुद्रुक ते चिंचोली या स्त्यांच्या कामाचे व इतर विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी केलेल्या भाषणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला. 

मराठा समाजाला इंग्रजांच्या काळापासून आरक्षण होतं, पण 1965 मध्ये ते काढून टाकण्यात आलं. मराठ्यांना कुणबी ठरवत काँग्रेसनेच मराठ्यांचे आरक्षण घालवलं, असा घणाघात बागडे यांनी आपल्या भाषणात केला. एवढेच नाही तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर घंटानाद केला होता, तेव्हा आपण त्याना मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आपल्या स्वाक्षरीने मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची आठवण देखील बागडे यांनी उपस्थितांना करून दिली. 

नानांचा प्रचार सुरू....
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून औरंगाबादचे उमेदवार म्हणून हरिभाऊ बागडे यांच्या नावाची चर्चा आहे. बागडे यांनी मात्र फुलंब्रीतून विधानसभा आपणच लढणार असे जाहीर करत प्रचाराला सुरूवात देखील केल्याचे दिसते. मराठा आरक्षणाचे श्रेय घेतांनाच आपल्या भाषणात शौचालय, हागणदारी मुक्त गाव, उज्वला गॅस योजना, पीक विमा, शेतकरी कर्जमाफी केल्याची आठवण उपस्थितांना करून दिली. गेल्यावेळच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी पेक्षा आताची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या फायद्याची असल्याचा दावा करतांनाच ज्या बॅंकांनी अद्याप कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना दिला नाही त्यांची चौकशी करणार असल्याचेही बागडे यांनी यावेळी सांगितले. 

एकंदरित केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, विकासकामांच्या सोबतीला आता मराठा आरक्षण दिल्याचा उल्लेख देखील भाजपकडून आर्वजून केला जातोय. आता त्याचा कितपत फायदा निवडणुकीत भाजप उमेदवारांना होतो हे लवकरच स्पष्ट होईल.

संबंधित लेख