लोकसभेसाठी भाजपकडून बागडेंचा विचार, पण त्यांना हवी विधानसभाच !

लोकसभेसाठी भाजपकडून बागडेंचा विचार, पण त्यांना हवी विधानसभाच !

औरंगाबाद : राज्य विधानसभेचे अध्यक्ष व फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच 72 व्या वर्षात पर्दापण केले. राजकारणातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव व त्यांचा जनसंपर्क लक्षात घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मैदानात उतरवण्याचा विचार भाजप पक्षश्रेष्ठींकडून सुरु आहे. परंतु हरिभाऊ बागडे हे लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही. फुलंब्रीमधून पुन्हा एकदा विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा असल्याचे बोलले जाते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी 2019 मध्ये मिशन 350 चे लक्ष्य निर्धारित करतांनाच पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बागडे यांना लोकसभा लढण्याचा आदेश आला तरच फुलंब्रीत अन्य उमेदवाराचा विचार होऊ शकतो. 

फुलंब्री व औरंगाबाद या दोन तालुक्‍यात फुलंब्री विधानसभा मतदारसंघ विभागलेला आहे. कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षांची या मतदारसंघावर कायम पकड राहिलेली आहे. कॉंग्रेसच्या कल्याण काळे यांचा पराभव करत हरिभाऊ बागडे 2014 मध्ये पुन्हा आमदार झाले. मोदी लाटेत भाजपने देशात व राज्यात मोठी झेप घेत सत्ता मिळवली. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी नावांची चर्चा झाली तेव्हा चाळीस वर्षाहून अधिक काळ संघाचे स्वयंसेवक व त्यानंतर भाजपमध्ये सक्रीय असलेल्या हरिभाऊ बागडे यांच्या नावाचा विचार झाला. पक्षनिष्ठा, जनसंपर्क आणि राजकीय अनुभवाच्या जोरावर राज्यातील सर्वोच्च पदावर बागडेंची निवड झआली. कॉंग्रेसने हिसकावलेला फुलंब्री मतदारसंघ बागडे यांनी पुन्हा खेचून आणल्यामुळे 2019 मध्ये पुन्हा फुलंब्रीमधूनच लढण्याची बागडे यांची तीव्र इच्छा आहे. तर त्यांच्या विरोधात पारंपारिक प्रतिस्पर्धी डॉ. कल्याण काळे कॉंग्रेसकडून उमेदवार असतील अशीच परिस्थिती आहे. परंतु विधानसभेआधी या दोघांचाही विचार लोकसभेसाठी पक्षाकडून केला जाऊ शकतो. अर्थात दीड वर्षात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर ते अवंलबून राहील. तुर्तास फुलंब्रीमधून हे दोन्ही जुने प्रतिस्पर्धीच शर्यतीत आहे. याशिवाय भाजपकडून महापौर भगवान घडामोडे, बागडे यांचे समर्थक प्रदीप पाटील यांची नावे चर्चेत आहेत. 

शिवसेना, राष्ट्रवादी बॅकफुटवर 
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेल्या अनुराधा चव्हाण यांनी 32 हजार मते घेतली होती. परंतु नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ स्वीकारले. त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल, माजी पंचायत समितीच्या सभापती माधुरी गाडेकर या देखील भाजपमध्ये दाखल झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीची मतदारसंघातील ताकद कमी झाली आहे. राष्ट्रवादी बरोबरच भाजपने कॉंग्रेसचे माजी मंत्री नामदेवराव गाडेकर, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी पाथ्रीकर, पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन शेजवळ यांनीही भाजपमध्ये प्रवेश देत मतदारसंघावर मजबूत पकड बसवली. परंतुु कालांतराने माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी देवगिरी साखर कारखाना, फुलंब्री बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपवर मात करत दणदणीत विजय मिळवला. बागडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. या पराभवाची परतफेड भाजपने पंचायत समितीत सात तर जिल्हा परिषदेला तीन जागा पटकावत केली. राष्ट्रवादी व शिवसेनेला खातेही उघडता न आल्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही पक्ष बॅकफुटवर आहेत. 

राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार 
राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवणाऱ्या अनुराधा चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीला या मतदारसंघात प्रबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. अजित पवार यांचे मावस बंधू नितीन देशमुख विधानसभा लढवण्यास इच्छूक असले तरी पक्षाला त्यांच्या विजयाची खात्री नाही. त्यामुळे त्यांनाही उमेदवारी नाकारली तर मग राष्ट्रवादीवर उमेदवार आयात करण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेकडून ठोंबरे, तुपेंची नावे चर्चेत 
भाजप विरूध्द कॉंग्रेस अशी थेट लढत असली तरी युती होणार नाही हे गृहित धरून शिवसेनेला उमेदवार द्यावे लागणार आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी सुरुवातीपासूनच पक्ष आदेश डावलून कॉंग्रेसच्या उमेदवाराला साथ दिल्याचे बोलले जाते. 2014 मध्ये युती तुटली आणि ऐनवेळी ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे ठोंबरे यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारही थांबविला होता. तरीही सध्या शिवसेनेपुढे राजेंद्र ठोंबरे यांच्याशिवाय दुसरे नाव नाही. औरंगाबाद महापालिकेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे हे फुलंब्री तालुक्तील असल्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा देखील विचार केला जाऊ शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com