hari narake criticizes tawade and more | Sarkarnama

तेथे पाहिजे `जातीचे` : हरी नरके यांचा तावडे व मोरेंवर हल्लाबोल

अमोल कविटकर
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कारकिर्दीत त्यांच्या स्वजातीय व्यक्तींच्या विविध सरकारी संस्थांवर नियुक्त्या होत असल्याचा मुद्दा हरि नरके यांनी उपस्थित केला आहे. त्यातही सदानंद मोरे यांना विविध ठिकाणी सर्वाधिक संधी दिल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. 

पुणे : शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी गेल्या चार वर्षांत केलेल्या समित्या, संस्था आणि प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या निवडीवर प्रा. हरी नरके यांनी फेसबुक पोस्टमधून 'खदखद' मांडली असून 'तेथे पाहिजे जातीचे' अशा शब्दांत या निवडींवर भाष्य केले आहे.

साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची निवड राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर प्रा. नरके यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

"अध्यक्ष वा सचिवपदी निवड झालेले हे सर्व गुणवंत मान्यवर त्यांच्या योग्यतेमुळे निवडले गेलेले आहेत यात शंका नसावी. ते मंत्रीमहोदयांचे स्वजातीय असणे, हा निव्वळ योगायोग समजावा. तो काही त्या अध्यक्षांचा वा सचिवांचा गुन्हा नाही", असे म्हणत प्रा. नरके यांनी गेल्या काही वर्षातील निवडींची यादीही दिली आहे. 

प्रा. नरके यांनी दिलेल्या उदाहरणानुसार, बालभारती, इतिहास समिती, भाषा सल्लागार समिती, साहित्य संस्कृती मंडळ, सारथी आणि ग्रंथ खरेदी तपासणी समिती अशा सहा संस्थांवर अध्यक्ष म्हणून मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय साहित्य संस्कृती मंडळ आणि उत्कृष्ठ वाड्मयनिर्मिती राज्य पुरस्कार समितीचे अध्यक्षपद आणि महाराजा सयाजीराव गायकवाड ग्रंथ समितीचे सचिवपद बाबा भांड यांच्या वाट्याला आले. तर राजर्षी छत्रपती शाहू ग्रंथ समितीचे सचिव म्हणून प्रा. रमेश जाधव आणि भाषा सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून प्रा. दिलीप धोंडगे यांना जबाबदारी दिली गेली.

यादी मांडत, "अशा पद्धतीने गुणीजनांचा आजवर गेल्या ६० वर्षात असलेला बॅकलॉग बहुधा प्रथमच भरला जात असावा", अशी खोचक टिपण्णीही प्रा. नरके यांनी केली आहे.

संबंधित लेख