"युपीए' च्या नियमाप्रमाणेच राफेल विमानांची खरेदी - हंसराज आहिर

"युपीए' च्या नियमाप्रमाणेच राफेल विमानांची खरेदी - हंसराज आहिर

औरंगाबाद :" राफेल विमान खरेदीत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. ही सगळी प्रक्रिया नियमाप्रमाणेच झालेली आहे, युपीए सरकारच्या काळात म्हणजे 2013 मधील नियमावलीचा आधार घेऊनच राफेल विमान खरेदी करण्यात आल्याचा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री हसंराज आहिर यांनी सोमवारी (ता.17) पत्रकार परिषदेत केला. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रक्रियेत सरकारने गैरव्यवहार केल्याचा आरोप कॉंग्रेसतर्फे करण्यात येत आहे. रविवारी (ता.16) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका परिसंवादात या संदर्भात टीका केली होती. यापुढेही राफेलच्या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती कॉंग्रेसने आखली आहे. 

कॉंग्रेसच्या या आरोपांना तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने देशभरात पत्रकार परिषदा घेऊन कॉंग्रेसवर पलटवार करण्याची तयारी चालवली आहे. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादेत आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर म्हणाले, स्वच्छ प्रतिमेचे सरकार म्हणून जनता मोदी सरकारकडे पाहते. यामूळे ना खाऊगा ना खाने दुंगा याप्रमाणे ते सध्या काम करतायेत. राफेल विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने सरकारला क्‍लीनचीट दिली आहे. सरकार किंवा सत्ताधारी पक्षाच्या कुठल्याही नेत्याकडून ऑफसेट भागीदाराची निवड करतांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झालेला नाही, त्यामुळे विरोधकांकडून होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचेही आहिर यांनी सांगितले. 

अनेक मुद्यांचा अभ्यास केल्यावर सुप्रीम कोर्टाने संरक्षण विषयक संवेदनशील बाबींची किंमत व इतर मुद्दे न्यायालयाच्या कक्षेबाहेर असल्याचे म्हटले आहे. तसेच यात कुठलीही अनियमीतता दिसून आली नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयानंतरही विरोधकांकडून कुठल्याही पुराव्याशिवाय सरकारवर आरोप केले जात आहेत. विरोधी पक्ष सरकारपेक्षा संरक्षण खाते आणि त्या मंत्रालयाच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील हंसराज आहिर यांनी केला. खोट्यानाट्या आरोपांमुळे जगभरात भारताची बदनामी होते आहे. दोन सरकारांमधील हा करार आहे. येथे कुठलीही इंडस्ट्रीज नाही, कोणी उद्योगपती नाही असेही आहिर यांनी स्पष्ट केले. 

देशप्रेमापेक्षा कॉंग्रेसला सत्ताप्रेम 
देशाला संरक्षणासाठी लढाऊ विमानाची गरज आहे. त्याच्या खरेदीत युपीए सरकारने विलंब केला. राफेलची खरेदी प्रक्रिया 2007 पासून सुरु झाली, पण 2013 पर्यंत खरेदी करण्यात आली नाही. विमान खरेदी न करता खरेदी करणाऱ्या सरकारवर आरोप लावणे हा देशाच्या सुरक्षेत हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. कॉंग्रेसला देशाबद्दल प्रेम नाही, त्यांना फक्‍त सत्ता हवी आहे. सत्तेच्या भूकेतूनच ते सरकारवर वाटेल ते आरोप करत असून पंतप्रधानांना बदनाम करत असल्याचे आहिर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com