hajare and patole | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

अण्णा हजारे व नाना पटोले 7 नोव्हेंबरला चिखलीत एका व्यासपीठावर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

भाजपसह इतर पक्षातील नेत्यांनी आज पटोले यांची भेट घेतली. भाजप व इतर कोण नेते आहेत, याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. येत्या 2 ते 3 महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संघटना निर्माण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भाजपचे खासदार नाना पटोले येत्या 7 नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे एकत्र येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍न धसास लावण्यासाठी आता अण्णा हजारे थेट आंदोलनाच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  गेल्या काही दिवसांपासून खासदार पटोले शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर केंद्र व राज्य सरकारवर टीका करीत आहेत. 

सरकारच्या विरोधात ते राज्यभर दौरेही करीत आहेत. त्यांच्यासोबतीला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येणार आहेत. या कार्यक्रमात 50 ते 60 हजार शेतकरी हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार पटोले यांनी आज नागपुरात दिली. यामुळे आता अण्णा हजारे सरकारविरोधात काय बोलणार? याकडेही लक्ष लागले आहे. आतापर्यंत अण्णा हजारे यांनी मोदी किंवा फडणवीस सरकारवर थेट हल्ला केला नाही. या मवाळ भूमिकेमुळे अण्णा हजारे यांची सोशल मिडीयावर चांगलीच खिल्ली उडविली जात आहे. भाजपचे खासदार नाना पटोले यांच्यासोबत व्यासपीठावर असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर अण्णांना ठोस भूमिका स्पष्ट करतील, असेही बोलले जात आहे. 

असंतुष्टांशी भेट 
भाजपच्या हेकेखोरपणामुळे त्रस्त झालेल्या काही वरिष्ठ नेत्यांची आज नाना पटोले यांनी नागपुरात भेट घेतली असून ते नेतेही नानासोबत मैदानात उतरायला तयार आहेत. केंद्र व राज्य सरकार गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी विरोधी धोरणे राबवित आहे. यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु राज्य सरकारची नियत शेतकऱ्यांना मदत करण्याची नसून शेतकऱ्यांपुढे अधिक अडचणी निर्माण करण्याची आहे अशी टीका ही नेतेमंडळी करत आहेत. 

भाजपसह इतर पक्षातील नेत्यांनी आज पटोले यांची भेट घेतली. भाजप व इतर कोण नेते आहेत, याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. येत्या 2 ते 3 महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संघटना निर्माण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख