चार मतदारांसाठी प्रशासन राबराब राबले; पण मतदानाला कुणी नाही आले !

 चार मतदारांसाठी प्रशासन राबराब राबले; पण मतदानाला कुणी नाही आले !

उस्मानाबाद : चार मतदारांसाठी राबराब राबले अन्‌ मतदानाला कुणीही नाही आले, अशी अवस्था उस्मानाबाद जिल्हा निवडणूक विभागाची शुक्रवारी झाली. विशेष म्हणजे दोन महिन्यांपासून जिल्ह्याचा निवडणूक विभाग अवघ्या चारच मतदारांसाठी मेहनत घेत होता; मात्र शुक्रवारी येथील तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर चारपैकी एकही मतदार फिरकला नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळ 2018 साठी शुक्रवारी मतदान झाले. 
सकाळी मतदानाला सुरवात होताच जिल्ह्यातील निवडणूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी तहसीलमधील मतदान केंद्रावर हजर झाले. 

14 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मतदानासाठी राबता होता. तर मतदान केंद्रावर एक केंद्रप्रमुख, एक शिपाई, तीन मतदान केंद्र अधिकारी असे पाच कर्मचारी होते. बंदोबस्तात तीन पोलिस कर्मचारी व एक उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी होता. त्यांच्यासोबतच एक नायब तहसीलदार, एक तहसीलदार, एक उपविभागीय अधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी; तसेच निवडणूक निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे दोन महिन्यांपासून ही सर्व टीम या चार मतदारांच्या मतदानासाठी राबत होती. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नांदेड येथे जाऊन प्रशिक्षणही घेतले होते. 
कार्यक्षेत्र जिल्ह्यातही 
औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या संपूर्ण जिल्ह्यांचा, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जीवती या तीन तालुक्‍यांतील मतदारांचा या निवडणूक प्रक्रियेत समावेश आहे. 
मतदार फिरकलेच नाहीत 
उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ चारच मतदार आहेत. यामध्ये भट्टी त्रिवेदीसिंग हरमलसिंग, भट्टी हरपालसिंग लालूसिंग, राठोड गुरुचरणसिंग अर्जुनसिंग, राठोड भारत अर्जुनसिंग यांचा समावेश आहे. या मतदारांना मतदानासाठी फोनद्वारे विचारणा करण्यात आली. मात्र, हे सर्व लग्नासाठी पंजाबमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. तीन सदस्यासाठी संपूर्ण मराठवाडा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीन ठिकाणी अशा एकूण 74 मतदान केंद्रे होती. या निवडणुकीत 12 हजार 714 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते तर तीन जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी सर्वांत जास्त 22 उमेदवार नांदेड शहरातील, तर चार उमेदवार औरंगाबाद येथील आहेत. नांदेड शहरात 15 मतदान केंद्रे होती. तसेच संपूर्ण नांदेड जिल्ह्यात तालुकास्थानी मतदान केंद्रे आहेत. मराठवाड्यात 71 आणि चंद्रपूर जिल्ह्यात तीन अशी 74 मतदान केंद्रे होती. सोमवारी (ता.31) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी काम पाहत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com