gulam nabi aazad | Sarkarnama

देशाला भाजप-आरएसएसचा गुलाम होऊ देणार नाही- गुलामनबी आझाद

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 ऑगस्ट 2017

तेव्हा ब्रिटीशांना चलेजाव म्हणाव लागले होते, आज भाजपला चलेजाव म्हणण्याची वेळ आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. मोदी सरकारच्या अच्छे दिन व स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवतांना "आधी तुमच्या डोक्‍यातील घाण स्वच्छ करा' असा टोला चव्हाणांनी लगावला.

औरंगाबाद : "ब्रिटीशांच्या विरोधात स्वातंत्र्यलढा उभारून देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण देश पुन्हा जातीयवादी विचारांचा गुलाम बनू पाहत आहे. भाजप, आरएसएस सारख्या शक्ती जनतेला गुलाम बनवू पाहत आहेत, पण कॉंग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये देशाला भाजप व आरएसएसचा गुलाम होऊ देणार नाही असे उद्‌गार अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी औरंगाबादेत काढले. 

स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, शिवाजीराव मोघे, आमदार सुनील केदार, अब्दुल सत्तार, सुभाष झाबंड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

"इंदिरा गांधी यांचे संपुर्ण आयुष्य संघर्षमय होते, त्यांना बालपणापासून ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत संघर्ष करावा लागल्याची अनेक उदाहरणे गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगतली. देशात अल्पकाळासाठी सत्तेवर आलेल्या तेव्हाच्या जनता पार्टीची मानसिकता आणि आजच्या भाजप सरकारच्या मानसिकतेत जराही फरक पडलेला नाही. देशात जातीयवाद निर्माण करत हिंदू, मुस्लीमांना वेगळे करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला. 

स्वातंत्र्य लढ्यात हिंदू-मुस्लिम एकत्र लढले, तसे आपण एकत्र का लढत नाही? एका पराभवाने तुम्ही घाबरलात का? जो डर गया वो मर गया? असे म्हणत त्यांना कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची उमेद जागवण्याचा प्रयत्न केला. तलवार घेऊन मैदानात उतरा, पण आम्हाला कुणाची मुंडकी छाटायची नाहीत. क्‍यो की गर्दन काटनेवाले हुकूमत चला रहे है, लेकीन हमे गांधीजी के विचारो पर चलना है असे म्हणत नव्या लढ्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले. 

भाजपचा खरेदी विक्री संघ झालाय-अशोक चव्हाण 
देशात पक्ष फोडाफोडीचे आणि सुडाचे राजकारण सुरु झाले असल्याचा आरोप करतांनाच भाजपची अवस्था एखाद्या खरेदी विक्री संघासारखी झाली असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. प्रत्येक राज्यात फोडाफोडीचे धंदे सुरु आहेत, ते बंद करा असे आवाहन करतांनाच गुजरातमध्ये अहमद पटेलांनी भाजपला चोख उत्तर दिल्याचे चव्हाणांनी सांगितले. 

सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जात आहे. इंदू सरकार सारखे चित्रपट निर्माण करुन देशाचा इतिहास व अखंडतेचा पाया उखडून फेकण्याचे काम आरएसएसकडून केले जातेय. पण कितीही प्रयत्न झाले तरी हा देश इंदिरा गांधींना कधीच विसरू शकणार नाही. आपण जर त्यांना विसरलो तर कृतघ्न ठरू. आज देशातील परिस्थिती पाहिली की स्वातंत्र्य संग्रामाचीआठवण होते. तेव्हा ब्रिटीशांना चलेजाव म्हणाव लागले होते, आज भाजपला चलेजाव म्हणण्याची वेळ आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. मोदी सरकारच्या अच्छे दिन व स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवतांना "आधी तुमच्या डोक्‍यातील घाण स्वच्छ करा' असा टोला चव्हाणांनी लगावला. देशातील जनतेला चूक झाल्याची जाणीव आता व्हायला लागली आहे, जीएसटीमुळे देशातील व्यापारी त्रस्त आहे. या परिस्थितीतूून देशाला बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधीच्या विचारांची उर्जा घेऊन पुन्हा बदल घडवूया असे आवाहन अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले. 

संबंधित लेख