मी तर साधा पानटपरीवाला, बाळासाहेबांनी मला गुलाल लावला अन म्हणाले ,जा तू निवडून  येशील !

हे बोलत असतांना बाळासाहेबांच्या आठवणीने गुलाबरावांचे डोळे भरून आले होते, अन कंठही दाटून आला होता.
gulabrao-Balasaheb
gulabrao-Balasaheb

जळगांव  : " बाळासाहेबांनी गुलाल डोक्‍याला लावला, गळ्यात ताईत टाकला. आणि ते म्हणाले जा तुला उमेदवारी दिली तू निवडून येशील..!त्यावेळी माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आले. मी भारावून गेलो.आजही तो क्षण मी माझ्या हदयात जपून ठेवला आहे," अशी भावनिक आठवण शिवसेनेचे उपनेते व राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली . 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीबाबत ते म्हणाले," सन 1999 मध्ये विधानसभा निवडणूका लागल्या होत्या. एरंडोल मंतदार संघात धनुष्यबाणाच्या चिन्हाचाच आमदार असावा असे मत तत्कालीन जिल्हा संपर्कप्रमुख विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले होते. त्यांनी बाळासाहेबाजवळ तसा आग्रहच धरला. "

"त्यावेळी मी  जिल्हाप्रमुख होतो. मी  बाळासाहेबांच्या समोरच बसलो होतो, समोर गुलालाची थाळी होती. त्यांनी त्या थाळीतील गुलाल हातात घेतला माझ्या कपाळावर लावला, गळयात ताईत टाकला आणि ते म्हणाले, जा तुला उमेदवारी दिली..तू निवडून येशील..!"

गुलाबराव पुढे म्हणाले ,"मला क्षणभर काहीच सुचले नाही, त्यांनी डोक्‍याला गुलाला लावतांना त्यांच्या हाताच्या स्पर्शाने माझे अंगात एक चैतन्य निर्माण झाले होते. गळ्यात ताईत टाकल्यानंतर मी अक्षरश: भारावलोच! काय बोलावे हे मला सुचत नव्हते. कारण मी एक साधा पानटपरी चालक शिवसैनिक होतो. "

"मला थेट विधानसभेची उमेदवारी मिळणे हेच मोठे होते.या निवडणूकीत मी त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो आमदार झालो. मात्र बाळासाहेबांनी त्यांच्या हाताने कपाळावर गुलाल लावून गळ्यात ताईत टाकल्याचा क्षण मी आजही हदयात जपून ठेवला आहे.त्यांनी दिलेला ताईत मी आजही जपून ठेवला आहे" .

 हे बोलत असतांना बाळासाहेबांच्या आठवणीने गुलाबरावांचे  डोळे भरून आले होते, अन कंठही दाटून आला होता.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com