गुजरातमध्ये राहुल गांधीनी सभांचे युद्ध जिंकले पण मोदींशी डावपेचांची लढाई हरले

या सोळा निकालांचे वैशिट्य असे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांना मिळालेली मते मतफरकापेक्षा कितीतरी अधिक आहेत. कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बसपाला जागावाटपात सामावून घेतले असते तर केवळ या सोळा जागाच नाही तर गुजरात राज्याची सत्ता कॉंग्रेसकडे चालून आली असती.
Narendra-modi--rahul-gandhi
Narendra-modi--rahul-gandhi

पुणे   :  नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभांचे युद्ध जिंकले. लोकांची मनेही जिंकली पण डावपेचांच्या लढाईत राहुल गांधींचा पराभव झाला. भाजपने भक्कम संघटन आणि डावपेचांच्या जोरावर हातातून निसटलेला विजय खेचून आणला. 

गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 60 जागांवर पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतफरकाने उमेदवार जिंकले आहेत. पाच हजार मतांपेक्षा कमी मतांच्या फरकाने 35 जागांचे निकाल लागले. यापैकी 16 जागांवर तर दोनशे ते दोन हजार मतांच्या फरकाने जय-पराजयाचे गणित ठरले. 

भाजपने गोध्रा (258), पोरबंदर (1855), राजकोट ग्रामीण (2179), प्रांतिज (2551), विजापूर (1164), हिंमतनगर (1712), फतेपुरा (2711), बोटाड (906), ढोलका (327), उमरेठ (1883), वीसनगर (2869), गारियाधर (1876), खंबाट (2318), मातर ( 2046), दाभोई (2839) आणि वागरा (2370) या सोळा जागा अटीतटीच्या लढतीत अत्यंत कमी मत फरकाने जिंकल्या. 

या सर्व सोळा निकालांचे वैशिट्य असे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांना मिळालेली मते मतफरकापेक्षा कितीतरी अधिक आहेत. कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बसपाला जागावाटपात सामावून घेतले असते तर केवळ या सोळा जागाच नाही तर गुजरात राज्याची सत्ता कॉंग्रेसकडे चालून आली असती. 

राहुल गांधी यांनी हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर हे तरुण तुर्क जोडून घेताना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बसपाला विचारात घेतले नाही. डावपेचातील हा आडाखा चुकल्याने कॉंग्रेस पक्षाला गुजरातमध्ये मोठी किंमत मोजावी लागली. 

नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी जीएसटीमुळे गुजरातसारख्या व्यापारप्रधान राज्यात भाजपला फटका बसू शकतो हे अचूकपणे हेरले आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी जीएसटी कलमामध्ये अनेक सवलती जाहीर करून टाकल्या. त्याचा परिणाम सुरत, अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून आला. शहरी भागामध्ये भाजपला आघाडी घेता आली. 

राहुल गांधी यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद जागोजागी मिळत होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाईचा निकाल जाहीर सभांना होणाऱ्या गर्दीवरून ठरला असता तर कॉंग्रेसचे पारडे जड झाले असते. पण तसे झाले नाही, याचे कारण राहुल गांधीच्या सभांना होणारी गर्दी मतपेटीत परावर्तित करण्यात कॉंग्रेस संघटन कमी पडले. 

बाहेरराज्यातून कॉंग्रेसने नेते आणि कार्यकर्ते बोलावले. त्यांना जबाबदाऱ्या आणि कामे वाटून दिली. पण या बाहेरच्या नेत्यांना मतदारसंघ आणि माणसे कळण्यापूर्वीच मतदानाची वेळ आली होती. अंतर्गत कलह आणि गटबाजीच्या राजकारणाने गेली वीस-पंचवीस वर्षे गुजरातमध्ये कॉंग्रेस संघटन खिळखिळे झालेले होते. 

राहुल गांधी यांनी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आपल्या पक्षाची ताकद ओळखून समविचारी पक्षांना जोडून घेण्याची मोहीम हाती घेतली असती अन्‌ संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला असता तर बरे झाले असते. 

भाजपचे भक्कम संघटन 
हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर या तिघांनी जातिवादाचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे केले. भाजपचे संघटन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु अमित शहा यांनी गुजरातमध्ये सुसंगत कार्यकर्त्यांची फौज उभी केलेली होती. पाच बुथमागे एक शक्तीकेंद्र, एक हजार मतदारांमागे 20 कार्यकर्ते आणि मतदारयादीतील एका पानावर असलेल्या तीस मतदारामागे एक पन्नाप्रमुख कार्यकर्ता पूर्णवेळ नेमलेला होता. 

महिलांमध्ये प्रभाव वाढविण्यासाठी भाजपने कमल मेहंदी अभियान राबविले. व्हॉटस्‌ऍप, मोदी ऍप, अशा माध्यमातून मतदारांचे ग्रुप तयार केले. गावागावात रॅली आणि सभांचे आयोजन करून घराघरापर्यंत कार्यकर्ते पोचविले. 

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या विभागवार आणि जिल्हानिहाय बैठका घेतल्या. याशिवाय पन्नाप्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने कार्यकर्त्यांपर्यंत साधनसामग्री आणि रसदीचा ओघ अखंड पुरविला जाईल यावर भाजपने भर दिला. 

अशाप्रकारे भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत गुजराती अस्मिता आणि नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा यांची सांगड घालीत भक्कम संघटनेच्या जोरावर हातातून निसटलेला विजय खेचून आणला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com