गुजरात : कॉंग्रेसचे चौदा बंडखोर आमदार सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित
कर्तव्यदक्ष आयुक्त
राज्यसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांची मते अवैध ठरविण्याचे धाडस दाखविणारे मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांच्या डॅशिंगपणाचे कौतुक होते आहे. 1975 च्या गुजरात केडरचे अधिकारी असणारे ज्योती नियमांचे काटेकोर पालन करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे ज्योती यांची निवड पंतप्रधान मोदी यांनीच केली होती.
अहमदाबाद : राज्यसभा निवडणुकी दरम्यान पक्षादेश झुगारून क्रॉस व्होटिंग करणाऱ्या कॉंग्रेसच्या 14 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या सहा आमदारांचा समावेश असून, त्यांच्यावर सहा वर्षांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या 14 आमदारांमध्ये कॉंग्रेस नेते शंकरसिंह वाघेला, त्यांचा मुलगा महेंद्रसिंह आणि कॉंग्रेसचे बंडखोर आमदार बलवंतसिंह राजपूत यांचाही समावेश आहे. गुजरात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी त्यांच्या निलंबनाचे पत्रक काढले आहे.
या बंडखोर आमदारांना अमित शहा यांनीच मंत्रिपदाचे आमिष दाखवून त्यांना पक्षातून फोडले होते. या बंडखोरांविरोधात कॉंग्रेसपक्ष निवडणूक आयोगाकडे जाणार असून त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली जावी, अशी विनंती आम्ही आयोगाकडे करणार आहोत, असे सोळंकी यांनी सांगितले.
गुजरात कॉंग्रेसच जिंकणार - पटेल
नवी दिल्ली (पीटीआय) : " राज्यसभेची निवडणूक जिंकल्याने कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला असून, नव्या जोमाने पक्ष बांधणी करण्यात येईल. गुजरात विधानसभेची निवडणूक आम्ही नक्कीच जिंकू. गुजरात विधानसभेची आगामी निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून, त्यात कॉंग्रेसचा विजय होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी दिला, " अशी टिप्पणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी गुरुवारी केली.
केवळ गुजरातचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांनी बाजी मारीत भाजपला धक्का दिला. जंतरमंतर येथे युवक कॉंग्रेसने भाजप सरकारच्याविरोधात आज निषेध फेरी काढली होती. त्या प्रसंगी पटेल बोलत होते.
गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करीत पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. "दोन व्यक्तींपासून भाजपलाही भय वाटते. यातील एकाला घटनेनुसार अधिकार आहेत, तर दुसऱ्याकडे घटनाबाह्य अधिकार आहेत. या दोन व्यक्ती कोण हे तुम्ही ओळखता. सर्व यंत्रणांचा गैरवापर होत आहे,'' अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता केली. कॉंग्रेस नेते सी. पी. जोशी आणि राज बब्बर यांचेही या वेळी भाषण झाले.