gujarata election, con, bjp leaders in gujarat | Sarkarnama

महाराष्ट्रातील भाजप, कॉंग्रेस नेत्यांनी गुजरातमध्ये तळ ठोकला

मृणालिनी नानिवडेकर 
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई : देशाच्या राजकारणाचा मूड जोखणाऱ्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्ते गुजरातकडे निघाले आहेत. राजीव सातव आणि वर्षा गायकवाड या महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस नेत्यांवर अखिल भारतीय महासचिव या नात्याने गुजरातची जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे दोन्ही नेते सतत गुजरात दौऱ्यावर असतात . 

मुंबई : देशाच्या राजकारणाचा मूड जोखणाऱ्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्ते गुजरातकडे निघाले आहेत. राजीव सातव आणि वर्षा गायकवाड या महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस नेत्यांवर अखिल भारतीय महासचिव या नात्याने गुजरातची जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे दोन्ही नेते सतत गुजरात दौऱ्यावर असतात . 

भाजपचे कार्यकर्तेही मनाने गुजरातेत पोहोचले असून डिसेंबरपर्यंत किमान दोन ते तीन हजार कार्यकर्ते तेथे डेरेदाखल होतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गुरूदास कामत यांनीही गुजरातेत दौरे सुरू केले आहेत. गुजरात विजय कॉंग्रेससाठी अत्यावश्‍यक मानला जात असल्याने ही जीवनमरणाची लढाई असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या एक दिवस आधी अस्तित्वात आलेले शेजारी राज्य या दोन पक्षांबरोबरच शिवसेनेच्या रोषाचा विषय ठरले आहे. 

गुजरातेच्या लढाईसाठी महाराष्ट्रात कॉंग्रेसने काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे. गुजरातचा विकास हा या पहाणीचा उद्देश. गुजरातेतील अल्पसंख्यांक मते आणि दलित मतदार कॉंग्रेसकडे वळावेत या हेतुने काही पहाणी करण्यात आली आहे. त्यात संपूर्ण भारतात दलितांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी शिक्षा होण्याचे प्रमाण 30 टक्‍के असताना गुजरातेत हा टक्‍का केवळ 5 टक्‍के असल्याची माहिती बाहेर आली आहे. आदिवासींवर झालेल्या अत्याचारात संपूर्ण देशात गुन्हा सिद्धतेचे प्रमाण 25 टक्‍के असताना ते गुजरातेत जेमतेम 4.5 टक्‍के असल्याची माहिती बाहेर आली आहे. 

गेल्या एक वर्षात दलितांवर झालेल्या अत्याचारात 21 टक्‍के वाढ झाल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डमुळे सिध्द होते आहे अशी आकडेवारी बाहेर आली आहे. बालमृत्यूत मोदींच्या गुजरातचा क्रमांक देशात 23 वा, प्राथमिक शिक्षणात 22 वा असल्याची माहिती बाहेर आली आहे. कॉंग्रेस या आधारावर प्रचाराची बांधणी करणार असून असताना भाजपने मात्र विजय आमचाच यावर जोर देत मतदारांशी संपर्क यंत्रणा बांधण्यावर भर दिला आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील कर्जतकर, राज पुरोहित, माधव भंडारी, अतुल शहा असे नेते गुजरातेत गेले तीन महिने वास्तव्याला होते. मतदारसंघांची बांधणी आणि रचना यावर भाजप भर देत असते. बडोदा परिसरातील मराठी बांधवांना, सूरतेतील आदिवासींना नेमके काय हवे याची शास्त्रशुध्द पहाणी गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपने केली आहे. बडोदयात मराठी बांधव बहुसंख्य असल्याने उमेदवार आपल्यातला असावा अशी त्यांची मागणी आहे. या व अशा माहितीला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपयंत्रणा करते आहे. आता खानदेश तसेच मुंबईतील कार्यकर्त्यांच्या तुकडया गुजरातेत जातील. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरूण कार्यकर्ता या नात्याने गुजरातेत तळ ठोकला होता. याच काळात नरेंद्र मोदी यांनी त्यांना हेरले असे म्हणतात. यावेळी शिवसेनाही या निवडणुकीचा भाग झाली आहे.भाजपच्या ध्येयधोरणांवर टीका करताना पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला शिवसेनेने जवळ केले होते. मात्र या निवडणुकीत सेना प्रत्यक्ष सहभाग घेणार नसल्याचे समजते. 

विस्तार लांबणीवर 
गुजरात निवडणुकीत महाराष्ट्रातील पक्षसंघटना व्यग्र होणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री प्रारंभापासूनच विस्ताराला पूर्णत: अनुकूल नसल्याने गुजरातचे निमित्त आयते हाती आल्याचेही सांगण्यात येते आहे. 
 

संबंधित लेख