guardian minister security | Sarkarnama

शेतकरी आंदोलन : पालकमंत्र्यांचा बंदोबस्त वाढविला! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांच्यावतीने एकत्रितपणे सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता साताऱ्यात वाढे फाटा तर कऱ्हाडात साडे अकरा वाजता कोल्हापूर नाका येथे आंदोलन होणार आहे.

सातारा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांच्यावतीने एकत्रितपणे सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता साताऱ्यात वाढे फाटा तर कऱ्हाडात साडे अकरा वाजता कोल्हापूर नाका येथे आंदोलन होणार आहे. दरम्यान, आंदोलनामुळे पालकमंत्री विजयी शिवतारे यांच्या नियोजित दौऱ्याचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

शेतकरी संघटनांसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी आंदोलने केली. शासनाने सुरवातीला नकारघंटा वाजविली. पण पुढे सर्वांच्या दबाव तंत्रामुळे अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीला मान्यता दिली. पण या कर्जमाफीला अनेक निकष लावल्याने कर्जमुक्त होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अल्प होत होती. त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा मुद्दा पुढे आला. यावरून शासनाने निकषात बदल केले. पण निकषांच्या जंजाळात अद्यापपर्यंत कर्जमाफी जाहीर झालेली नाही. तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत विधान सभेत चर्चादेखील झाली नाही. त्यामुळे सुकाणु समितीने स्वातंत्र्यदिनी मंत्र्यांना ध्वजवंदन करू न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोमवारी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व शेतकरी संघटना एकत्रितपणे सहभागी होणार आहेत. 

मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात साताऱ्यातील शेतकरी संघटना, बळीराज शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढे फाटा येथे सकाळी दहा वाजता महामार्ग रोको आंदोलन करणार आहे. तर बळीराज शेतकरी संघटना कऱ्हाडमध्ये कोल्हापूर नाका व निसरे फाटा या दोन ठिकाणी रास्ता रोको करेल. पुसेगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन होईल. स्वातंत्र्य दिनी सर्व शेतकरी संघटना मिळुन पालकमंत्र्यांना ध्वजवंदनापासून रोखणार आहेत. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. 

पालकमंत्री विजय शिवतारे सोमवारी (ता. 14) साताऱ्यातील विश्रामगृहात मुक्कामी येणार आहेत. संघटनेचे आंदोलन आणि स्वातंत्र्य दिनी मंत्र्यांना ध्वजवंदन करू न देण्याची सुकाणु समितीची सूचना लक्षात घेता पोलिसांनी शासकिय विश्रामगृहासह सर्वत्र बंदोबस्त वाढविला आहे. 
 

संबंधित लेख