Guardian minister Bawankule and Nagpur Corporation | Sarkarnama

बावनकुळेंनी घेतला जनता दरबार पण महापालिका पदाधिकारी फिरकले नाहीत 

सरकारनामा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

महापालिकेतील पदाधिकारी आपल्याच 'इव्हेंट'मध्ये व्यस्त असल्याचे दिसत असल्याने वाड्यावरून पालकमंत्री आणि महापौरांना महापालिकेत लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आल्याचे भाजपच्या वतुर्ळात बोलल्या जात आहे.

नागपूर :   महापालिकेच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जनता दरबार घ्यावा लागत असल्याने भाजपच्या  महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी धुसफूस  सुरू असल्याचे चित्र दिसत  आहे. बावनकुळेंच्या जनता दरबाराकडे महापौर वगळता भाजपचे इतर पदाधिकारी फिरकत नसल्याने ते अधिक ठळकपणे जाणवत आहे.

बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि अबकारी अशा दोन विभागाची जबाबदारी आहे. याशिवाय पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यातही त्यांना भटकंती करावी लागते, बैठका घ्याव्या लागतात. महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. भाजपचे तब्बल 108 नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौर, सत्तापक्षनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, झोनचे अध्यक्ष असे वाटपही भाजपने केले आहे.

 इतकी मोठी फळी उपलब्ध असताना पालकमंत्र्यांना जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी जनता दरबार घ्यावा लागत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एकतर भाजप नेतृत्वाचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर विश्‍वास नाही किंवा ते काम करीत नाही असा याचा अर्थ लावल्या जात आहे.

दहा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या काळात राज्यात आघाडीचे सरकार होते. जिल्ह्याचे पालकमंत्री कॉंग्रेसचे होते. तेव्हा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांना कधीच बोलावले नाही. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्येसुद्धा त्यांचा उल्लेख केला जात नव्हता. महापालिका प्रोटोकॉल पाळत नसल्याने नाराजीसुद्धा व्यक्त करण्यात आली होती. 

यंदा मात्र पालकमंत्र्यांशिवाय महापालिकेच कामकाज भागत नसल्याचे दिसून येते. वास्तविक जनता दरबार घ्यायची जबाबदारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. काही समस्या राज्यपातळीवरच्या असतील तर पालकमंत्र्यांच्या दरबारी नेणे हे त्यांचे काम आहे.

मात्र महापालिकेतील पदाधिकारी आपल्याच "इव्हेंट'मध्ये व्यस्त असल्याचे दिसत असल्याने वाड्यावरून पालकमंत्री आणि महापौरांना महापालिकेत लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आल्याचे भाजपच्या वतुर्ळात बोलल्या जात आहे.

संबंधित लेख