GST is anti farmer : Mla Prakash Gazbiye | Sarkarnama

जीएसटी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर  :राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांचा आरोप 

संजीव भागवत: सरकारनामा न्यूज ब्युरो 
शुक्रवार, 19 मे 2017

जीएसटीच्या कायद्यातून शेतकऱ्यांना नेमका काय लाभ मिळणार, हा प्रश्‍न अधांतरी ठेवण्यात आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. उलट व्यापाऱ्यांना अधिकाधिक नफा कमविण्याची अधिक संधी हा कायदा उपलब्ध करून देत असल्याचा आपला ठाम दावा असल्याचेही गजभिये म्हणाले. 

मुंबई :केंद्र सरकारने आणलेला जीएसटीचा कायदा हा केवळ राज्यातीलच नाही तर देशातील शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणारा असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला.

 या कायद्यातून शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही, मात्र त्यांनी उत्पादन केलल्या वस्तुंवर त्याला कर भरावा लागणार आहे, त्या तुलनेत आयते बसून केवळ दलाली करणाऱ्या व्यापाऱ्यांचेच यातून भले होणार असल्याने या कायद्याला आपण सभागृहात कडाडून विरोध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

जीएसटीच्या कायद्यातून शेतकऱ्यांना नेमका काय लाभ मिळणार, हा प्रश्‍न अधांतरी ठेवण्यात आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. उलट व्यापाऱ्यांना अधिकाधिक नफा कमविण्याची अधिक संधी हा कायदा उपलब्ध करून देत असल्याचा आपला ठाम दावा असल्याचेही गजभिये म्हणाले. 

या नवीन कायद्यासाठी सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची गरज वाटली, परंतु राज्यातील शेतकरी आपल्या कर्जाच्या बोझ्याखाली येउन हवालदिल झालेला असताना त्यांच्यासाठी सरकारला विचार करायलासुद्धा वेळ नसल्याचा आरोपही गजभिये यांनी केला. 
जीएसटीच्या कायद्यातून प्रत्येक ठिकाणी व्यापाऱ्यांचे हित पाहण्यात आलेले आहे. यात ग्राहकाकडून ज्या प्रकारे कर वसुल केला जाणार आहे, त्याच प्रमाणे व्यापाऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य वर्गांचे खिसे  कापून सरकार कर गोळा करणार असेल तर त्याला आपला कडाडून विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. कापूस, धान्य आणि विविध प्रकारच्या पिकांचे उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना काय देणार आहात, हा आपला या विशेष अधिवेशानातील मोठा सवाल असणार असल्याचेही गजभिये यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

संबंधित लेख