great man with simple living | Sarkarnama

साधेपणा जपणारा मोठा नेता : गणपतराव देशमुख

संपत मोरे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचा आज ९१ वा वाढदिवस. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांचा लौकीक आहे. विधानसभेत ते तब्बल ११ वेळा निवडून गेले आहे. गेल्या ५५ वर्षांत एकाच पक्षाचा झेंडा, एकच मतदारसंघ असे त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य आहे.

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आहे.त्यांना मुंबईला जायचं होत म्हणून ते एक दिवस सातारा एसटी स्टँडवर आले.मुंबईला जाणाऱ्या गाडीत ते बसले. त्यानंतर थोड्या वेळाने वाहक गाडीत येऊन बुकिंग करू लागला. प्रवाशयांची तिकीट काढत तो आबांच्याजवळ आला तेव्हा आबा म्हणाले, "मला मोफत प्रवास आहे. मी आमदार आहे.

"ते वाहक आबांना ओळखत नव्हते. पण त्याना एक आमदार आपल्या गाडीतून प्रवास करत आहेत याच खूपच आश्चर्य वाटलं.आणि मग ते सरळ गाडीतून खाली उतरले.वरीष्ठांना जाऊन हि गोष्ट सांगितली. मग गाडीत बसलेले नेमके आमदार कोण?हे बघायला वाहकांच्या सोबत वरिष्ठही आले. त्यानी येऊन बघितलं तर आमदार गणपतराव देशमुख. त्याना आबांना बघून खूपच आनंद झाला. ते आबांना सन्मानाने कार्यालयात घेऊन गेले.त्यांचा सत्कार केला. आबांच्या या  हा  साधेपणाचे दर्शन सगळ्या प्रवाशी,एसटी कर्मचारी यांना झाले.

आबांच्या बाबतीत असे अनेक किस्से आहेत. आबा पुलोद सरकारमध्ये मंत्री होते पण त्यांनी कधीही बायको मूलं यांना मुंबईला मंत्रीनिवासात नेलं नाही.त्यावेळी ज्या क्षणाला आबांचे मंत्रिपद गेलं तेव्हा आबांनी सरकारी बंगला,गाडी लगेच सोडून दिली.तिथून ते टॅक्सीने परेल एसटी स्टँडवर गेले आणि मुंबई-सांगोला गाडीने गावाकडे आले. अलीकडच्या काळात दंतकथा वाटतील अशा आबांच्या सत्यकथा आहेत. आबांचे अवघे जीवन अशा साधेपणानी भरले आहे.

एक गोष्ट तर त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलेली. आबा कोल्हापूरला निघाले होते. जेवणाची वेळ झाली.मग आबांनी एका शेताजवळ गाडी थांबवायला लावली. तिथं शेताला पाणी सुरु होत. एका आंब्याच्या झाडाखाली बसून दोघांनी जवळची भाकरी खाल्ली. आणि पुढच्या प्रवासाला निघाले. चालक नवीन होता त्याला या गोष्टीच खूप आश्चर्य वाटले. 

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सगळ्या आमदारांना ज्यांच्याबद्दल आदर वाटतो असे आबा.पण हा आदर वाटण्याचं कारण म्हणजे आबांची साधी राहणी आणि समतोल विचारसरणी.सगळे त्याना प्रेमाने 'आबासाहेब'म्हणतात. पण आबासाहेब या पदापर्यंत येण्यासाठी आबांनी घेतलेले कष्ट, जपलेली समाजाची बांधिलकी या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज आहे.

१९५२ पासून आजअखेर समाजासोबत आहेत. दोन वेळेचा पराभवाचे अपवाद सोडले तर सलगपणे आमदार आहेत. राज्यात सर्वाधिक काळ त्यांनी विधिमंडळात काम केले आहे.आज त्यांचं वय ९१ आहे पण आज कोणी साधे पोस्टकार्ड टाकले तरी त्याची दखल ते घेतात. एवढ्या वयातही ही उर्जा कोठून येते?आबा हे आमदार सांगोल्याचे आहेत पण आबा सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचे आहेत. आजही आबांकडे पाहून आम्हाला आधार वाटतो असे सांगणारे कार्यकर्ते गावोगावी भेटतात.आबांचे आयुष्य हीच या कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे.आबांचा विचार त्याना बळ देतो.

संबंधित लेख